बेळगाव : बनावट कागदपत्रे तसेच तब्बल 145 कोटी रुपये मूल्य असलेले बनावट इन्व्हॉइस बनवून 43 कोटी जीएसटी बुडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मालमत्ता व सेवा कर गुप्तचर महासंचालनालय बेळगाव झोनलने बंगळूरच्या एकाला अटक केली आहे. मात्र त्याचे नाव जाहीर केलेले नाही.
याबाबत जीएसटी विभागाने पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. बंगळूर येथे बसून संबंधित व्यक्तीने बनावट जीएसटी नोंदणी क्रमांक तयार केला. अन्य बनावट कागदपत्रेदेखील तयार केली. या खोट्या कागदपत्रांचा वापर करून त्याने खोटा आयटीसी (इनपूट टॅक्स क्रेडिट) देखील दिला व घेतला. हे सर्व करताना खोटी इन्व्हॉस व खोटीच ई-वे बिले तयार करण्यात आली. कोणतीही कंपनी अस्तित्वात नसताना फक्त कागदपत्रांमध्ये फेरफार करत हा सर्व प्रकार केल्याचे आढळून आले आहे.
पोलिसांनी त्याच्यावर बंगळूर येथे सीजीएसटी कायदा 2017 कलम 69 अंतर्गत गुन्हा दाखल करून तेथेच अटक केली. त्याला आर्थिक गुन्ह्यांसाठी असलेल्या विशेष न्यायालयासमोर हजर केले. तेथून त्याला बेळगाव विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार ट्रांझीट रिमांडअंतर्गत नुकतेच त्याला बेळगावात आणण्यात आले.
43 कोटी जीएसटी बुडवण्यासाठी या संशयिताने ज्या क्लृप्त्या लढवल्या आहेत, याचा तपास जीएसटी गुप्तचर विभागाला करायचा आहे. यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे की त्याने एकट्याने हा प्रकार केला आहे, याचीही चौकशी केली जाईल.