Latest

Sugarcane Juice : रसवंती गृहात घुंगरांचा छनछनाट पुन्हा सुरू; अवकाळीमुळे रूतले होते यंत्राचे चाक

अविनाश सुतार


गेवराई: मागील वर्षी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांची रसवंतीगृह अवकाळी पावसाने लवकर बंद झाली होती. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. वातावरणातील बदलामुळे यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाळा जाणवू लागला आहे. रस्त्याच्या कडेला छोट्या व्यावसायिकांनी रसवंतीगृह सुरू केले आहेत. साहजिकच नागरिकांची पावले रसवंतीगृहाकडे वळू लागली आहेत. एक ग्लास द्या, जास्त बर्फ टाकू नका…' हे वाक्य रसवंतीगृहातून ऐकू येऊ लागाले आहे. Sugarcane Juice

मागील वर्षी अवकाळी पावसाने खूप मोठे नुकसान झाले. व्यवसाय ठप्प झाला होता. बंद असलेली यंत्राची चाके यंदा पुन्हा फिरू लागल्याने घुंगराचा छनछनाट ऐकू येऊ लागला आहे. उन्हाच्या झळांनी कासावीस झालेल्या जीवाला उसाच्या रसाने 'गोडवा' मिळू लागला आहे. उन्हाळ्यात उसाचा ताजा रस पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. बालगोपालापासून वृद्धांपर्यंत हा हवा हवा असणारा ताजा रस आता शहरी भागासह ग्रामीण भागात मिळू लागला आहे. रस पिल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून डिहायड्रेशनपासून बचाव होतो. शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. Sugarcane Juice

रस्त्याच्या बाजूला रसवंती गृहाच्या घुंगरांचा खुळखुळा आवाज घुमू लागतो. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना तो आवाज जणू साद घालत असतो. सर्वजण कुटुंबासह लिंबू व आले घातलेल्या उसाच्या रसाचा मनसोक्त आस्वाद घेतात. ग्रामीण व शहरी भागासाठी हंगामी पण कमी भांडवलात करता येणारा आणि चांगले उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे. उन्हामुळे अंगाची चांगलीच लाहीलाही होत असताना प्रत्येक जण काहीतरी थंड पिण्यास पहिली पसंती देतो. त्यातूनच आरोग्यदायी उत्तम पेय म्हणून उसाचा रसाला सर्वजण पसंती देतात. अगदी गजबजलेल्या शहरापासून ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरील रस्त्याच्या कडेला असणारी ही रसवंतीगृहे तृषा भागवतात.

सर्वसामान्य शेतकरी मजूर व्यावसायिक यांचे आर्थिक घडी विस्कळीत झाली होती. चांगला उत्पन्नाच्या आशेने अनेक शेतकरी शेतात रसवंतीसाठी ऊस लागवड करतात. उसाच्या रसाला रसवंतीच्या माध्यमातून कर्मशियल स्वरूप दिले जाते. शेतकरी अनेक जण साखर कारखान्याला ऊस न देतात आता स्वतः रस्त्याच्या कडेला रसवंती गृहाचा व्यवसाय देखील करतात. गेवराई येथील जुने रसवंती चालक संदीप टोणपे यांना रसवंतीगृहाच्या यंत्राला घुंगरू का बांधतात ?, हे विचारले असता त्यांनी 'दै. पुढारी' शी बोलताना सांगितले की, बैलाच्या गळ्यातील घुंगरू यंत्राला बांधत असल्यामुळे बैलाची आठवणी मिळते. पूर्वी बैलाच्या घानाव्दारे रस काढत असत. आता यंत्राद्वारे उसाचा रस काढला जातो. आपल्या बैलाची आठवण रहावी व ग्राहक आकर्षित व्हावे, म्हणून घुंगरू लावले जातात, असे त्यांनी सांगितले.

Sugarcane Juice : उसाच्या रसाचे असे आहेत फायदे

1) स्किनसाठी उत्तम अल्फा हायड्रॉक्सी एसिड आणि ग्लाकोलिक अॅसिडने भरपूर स्किनसाठी अमृतासमान आहे. यामुळे पिंपल्स दूर होतात. वय वाढणे थांबविते आणि त्वचा चिरतरुण ठेवण्यात मदत मिळते.

2) डिहायड्रेशन पासून बचाव
उन्हाळ्यामुळे या डिहायड्रेशनची भीती सतत सतावत असते. कॅल्शियम, मॅग्नेशियम पोटॅशियम, आयरन आणि मॅगनीजने भरपूर उसाचा रस इलेक्ट्रो लाईट्स आणि पाण्याची कमतरता भरून काढतो.

3) ऊर्जेचा उत्तम स्तोत्र
यात ग्लुकोजची मात्रा अधिक असते. ग्लुकोज आणि इतर इलेक्ट्रोलाइटस याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतात. यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जा मिळत नाही, तर उन्हापासून बचाव करून शरीराला शांत ठेवणे देखील मदत करतो

4) तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते.

या वर्षी व्यवसाय लवकर सुरू झाल्याचे समाधान आहे. ग्राहकांची उसाच्या रसाला पसंती लाभत आहे. उसाच्या दरात भाव वाढ झाली आहे. आम्ही रसाचे दर न वाढवता ते दर पूर्वीप्रमाणेच ठेवले आहेत. अनेक ग्राहक उभा राहून रस काढून घेत आहेत.

– विक्रम गिरी, व्यावसायिक, रसवंती चालक

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT