अटक 
Latest

बीड : डीजे लावून गड्याचा हवेत गोळीबार; हळद पुसण्याआधीच नवरदेवाची ‘वरात’ जेलमध्ये !

अविनाश सुतार

अंबाजोगाई : पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाचे लग्न रविवारी होते. त्याआधी शनिवारी हळदी समारंभ संपल्यानंतर डीजेच्या तालावर ताल धरत चक्क नवरदेवाने पिस्टलमधून हवेत गोळीबाराच्या फैरी झाडल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सोमवारी नवरदेवासह अन्य चार जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे नवरदेवाला अंगावरील हळद निघाली नसताना व वैवाहिक जीवनाची सुरूवातच जेलच्या हवेने करावी लागणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील हॉटेल व्यावसायिक बालाजी भास्कर चाटे (रा. साकुड ह.मु.अंबाजोगाई) याचा विवाह बीड रोडवरील एका मंगल कार्यालयात रविवारी आयोजित केला होता. शनिवारी हळदी समारंभ पार पडल्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास नवरेदवाने आपल्या मित्रासोबत डीजेच्या तालावर ठेका धरला. मित्रांसोबत नवरदेवाचा आनंद गगनात मावेनासा झाल्यामुळे मित्राच्या खांद्यावर बसून गाण्याच्या तालावर नाचत नवरदेवाने हवेत गोळ्याच्या फैरी झाडल्या. यावेळी त्याच्याच एका मित्राने या गोळीबाराचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी या प्रकरणी आवाज उठविला.

यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. आणि पोलीस नाईक गोविंद यलमाटे यांच्या फिर्यादीवरून शहर ठाण्यात नवरदेव बालाजी चाटे व त्याचा मित्र शेख बाबा (रा.क्रांतीनगर) यांच्यासह तिघांवर अवैधरित्या पिस्टल हातात घेवून हवेत गोळीबार केला. इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सुर्यवंशी यांच्याकडे दिल्यानंतर नवरदेवासह इतर आरोपींच्या शोधासाठी चक्रे फिरविली. संबंधित नवरदेवाच्या घरी पाहणी केली असता तो आढळून आला नाही. यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तपासाची चक्रे फिरविली. यानंतर शहर पोलिसांना गुप्त माहितीवरून बालाजी चाटे आणि बाबा शेख साकुड येथील त्यांच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून मंगळवारी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्यांना प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी एन.सी.बोरफळकर यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हळद पुसण्याआधीच नवरदेवाला खावी लागली जेलची हवा

लग्नाचा बार उडण्याआधीच नवरदेवाने हवेत गोळीबार केल्यामुळे लग्नाच्या दुसर्‍या दिवशीच फरार व्हावे लागले. पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. अखरे तो त्याच्या गावाकडील शेतामध्ये लपून बसल्यामुळे तेथून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. यामुळे नवरदेवाच्या वैवाहिक जीवनाची सुरूवात जेलच्या हवेने झाल्यामुळे शहरामध्ये हे प्रकरण मोठ्या चवीने चर्चीले जात आहे.

हेही वाचलंत का ?  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT