बीड, पुढारी वृत्तसेवा : बीडमधून महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. सुरेश नवले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना हा धक्का मानला जात आहे. (Beed Lok Sabha Election)
प्राध्यापक सुरेश नवले हे महायुती सरकारच्या काळात मंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर ते शिवसेनेतून बाहेर पडले होते. काही काळ नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये देखील ते होते. आता काही काळापासून ते शिवसेना शिंदे गटात सक्रिय होते. परंतु आता भाजपाकडून शिंदे गटाला सापत्न वागणूक दिली जात असून, यात शिवसैनिकांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत त्यांनी आता शिवसेना शिंदे गटाला सोडचिट्टी दिली आहे. त्यांनी आगामी राजकीय वाटचाल जाहीर केली नसली तरी सध्या तरी त्यांनी बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला असून, बीड मधील मेळाव्यात हा त्यांनी निर्णय जाहीर केला.
माजी मंत्री सुरेश नवले यांचा जिल्ह्यात मोठा संपर्क आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात महत्त्वाच्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी हा पाठिंबा आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून या माध्यमातून महत्त्वाचे नेते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. (Beed Lok Sabha Election)
हेही वाचा :