मुंबई; पुढारी ऑनलाईन : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) तीन सदस्यीय सल्लागार समितीची (CAC) गुरुवारी (दि. १) घोषणा केली. माजी क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे यांची सल्लागार समितीसाठी निवड करण्यात आली आहे. मागील समितीतील सुलक्षणा नायक यांच्यासह या तीन सदस्यांच्या समितीची बीसीसीआयने आज घोषणा केली. या समितीकडून या महिन्याच्या अखेरपर्यंत मुख्य निवड समिती पॅनलची निवड करण्यात येणार आहे. (BCCI Cricket Advisory Committee)
मल्होत्रा यांचा माजी भारतीय वेगवान गोलंदाज मदन लाल यांच्या जागी सल्लागार समितीमध्ये समावेश करण्यात आला तर रुद्र प्रताप सिंग यांच्या जागी परांजपे यांचा समावेश करण्यात आला आहे. रुद्र प्रताप सिंग मुंबई इंडियन्समध्ये 'टॅलेंट स्काऊट' म्हणून सामील झाले आहेत. यापूर्वीच्या समितीमधील केवळ माजी महिला क्रिकेटपटू सुलक्षणा नायक यांना कायम ठेवण्यात आले आहे. (BCCI Cricket Advisory Committee)
मल्होत्रा यांनी सात कसोटी आणि 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि अलीकडेच ते भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे अध्यक्ष होते. तसेच परांजपे यांनी भारतासाठी चार एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि ते वरिष्ठ पुरुष निवड समितीचा भाग होते. (BCCI Cricket Advisory Committee)
नोव्हेंबरमध्ये, बीसीसीआयने चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील संपूर्ण निवड समिती बरखास्त केली. या निवड समितीमध्ये हरविंदर सिंग, सुनील जोशी आणि देबाशीष मोहंती यांचा समावेश होता. T20 विश्वचषकातून भारत उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर निवड समिती बरखास्त करण्यात आली.
नव्या निवड समिती सदस्यासांसाठी बीसीसीआयकडून पुन्हा अर्ज मागविण्यात आले आहे. हरविंदर सिंग आणि चेतन शर्मा यांनी पुन्हा या पदासांठी अर्ज दाखल केला आहे. तर सुनील जोशी आणि देबाशीष मोहंती यांनी पुन्हा अर्ज केलेला नाही. नयन मोंगिया, व्यंकटेश प्रसाद, मनिंदर सिंग, शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला, अमय खुर्सिया, रितिंदर सिंग सोढी, निखिल चोप्रा आणि अतुल वासन यांनी नव्या निवड समितीच्या पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत.
अधिक वाचा :