पुढारी ऑनलाईन डेस्क : 6 Wickets in 6 Balls : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत निकालाबाबत काय होईल याचा काही नेम नसतो. असाच एक कारनामा ऑस्ट्रेलियातील थर्ड डिव्हिजनच्या क्लब क्रिकेट सामन्यात घडला आहे. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात केवळ 5 धावा काढायच्या होत्या. पण प्रतिस्पर्धी संघाच्या गॅरेथ मॉर्गन या गोलंदाने असा काही चमत्कार केला की, सर्वांनाच धक्का बसला आहे.
ऑस्ट्रेलियाचा थर्ड डिव्हिजन क्लबचा खेळाडू गॅरेथ मॉर्गनने स्थानिक सामन्यात एका षटकात 6 विकेट घेत आपल्या संघाला चित्तथरारक विजय मिळवून दिला. या दारुण पराभवाची विरोधी संघाने कल्पनाही केली नसेल. मुदगीराबा नेरांग अँड डिस्ट्रिक्ट्स क्रिकेट क्लबचा कर्णधार मॉर्गनने गोल्ड कोस्ट प्रीमियर लीगच्या थर्ड डिव्हिजन सामन्यात सर्फर्स पॅराडाईज विरुद्धच्या सामन्यात सहा चेंडूत 6 बळी घेत आपल्या संघाला चार गडी राखून विजय मिळवून दिला. 40-40 षटकांच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुदगीराबा नेरंगने 178 धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सर्फर्स पॅराडाईज संघाने 39 षटकांअखेर 174 धावांपर्यंत मजल मारली. त्यांना शेवटच्या षटकात त्याला 6 चेंडूत 5 धावा काढायच्या होत्या. अशा स्थितीत त्यांचा विजय पूर्णपणे निश्चित मानला जात होता. मात्र, गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या मॉर्गन गॅरेथने आपल्या षटकातील पहिल्या चार चेंडूंवर चार फलंदाजांना झेलबाद केले. तर पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर दोन फलंदाजांना क्लिनबोल्ड केले.
गॅरेथ मॉर्गनपूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये तीन गोलंदाजांनी एका षटकात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. यामध्ये ओटागोकडून खेळणाऱ्या नील वॅगनरने वेलिंग्टनविरुद्धच्या सामन्यात एका षटकात पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडले होते. याशिवाय अल अमीन हुसेनने 2013 मध्ये युसीबी-बीसीबी इलेव्हनकडून खेळताना अभानी लिमिटेड विरुद्ध पाच विकेट्स पटकावण्याची किमया साधली होती. तर भारताच्या अभिमन्यू मिथुनने 2019 साली कर्नाटककडून खेळताना हरियाणाविरुद्धच्या सामन्यात एका षटकात 5 विकेट घेतल्या होत्या.
हेही वाचा :