SARTHI Fellowship | ‘सारथी’च्या सरसकट फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांचे १६ व्या दिवशी उपोषण सुरुच | पुढारी

SARTHI Fellowship | 'सारथी'च्या सरसकट फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांचे १६ व्या दिवशी उपोषण सुरुच

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य सरकारने ‘सारथी’च्या २०२३ च्या बॅचला सरसकट फेलोशिप मंजूर करावी, या मागणीसाठी संशोधक विद्यार्थ्यांचे गेल्या १५ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा १६ वा दिवस आहे. अद्यापही शासनस्तरावरून दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. (SARTHI Fellowship)

SARTHI Fellowship : सरकारचा निषेध करीत काळी दिवाळी साजरी

शासनाने मागण्या मान्य केल्याशिवाय माघार घेणार नाही. अशा भावना सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. १० नोव्हेंबर पासून दिवाळी सुरू आहे. ऐन दिवाळीतही विद्यार्थ्यानी उपोषण कायम ठेवत ‘काळी दिवाळी’ साजरी केली. रविवारी (दि.१२) दिवाळीच्या मुख्य दिवशी विद्यार्थ्यांनी सारथी कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर काळी रांगोळी घातली. काळे कपडे परिधान करुन सरकारच्या विरोधात घोषणा देत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. (SARTHI Fellowship)

SARTHI Fellowship : काय आहेत प्रमुख मागण्या

सारथी कृती समितीच्या नेतृत्वाखाली ‘सारथी’ च्या विद्यार्थ्यांचे दि.३० पासून उपोषण ‘सारथी’च्या कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. राज्यभरात ठिकठिकाणी संशोधक विद्यार्थी आंदोलन, उपोषण करत आहेत. सारथी संशोधक विद्यार्थ्यांच्या पुढीलप्रमाणे मागण्या आहेत. २०२३ मधील पात्र सारथी संशोधक विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट अधिछात्रवृत्ती/ फेलोशिप देण्यात यावी. सारथी संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी प्रमाणे विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती देण्यात यावी यासह सारथीने संशोधक फेलोशिपची संख्या ५० आहे. ५० विद्यार्थ्यांना न देता सरसकट विद्यार्थ्यांना द्यावी, सारथी प्रशासनाने सारथी कृतीसमितीच्या शिष्टमंडळाची मंत्र्यांबरोबर बैठक घडवून आणावी या आहेत.

संशोधक विद्यार्थी आक्रमक

सरसकट नोंदणी दिनांकपासून मिळण्यासाठी गेले 16 दिवस साखळी उपोषण सुरू आहे. सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. सरकारने तातडीने यावर निर्णय देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.अन्यथा संशोधक विद्यार्थी हा लढा अजून तीव्र करतील.

-प्रियांका पाटील

 

सरकारने विद्यार्थी विरोधी घेतलेल्या भुमिकेमुळे संशोधक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. संशोधक विद्यार्थी, अभय गायकवाड म्हणतात,” या सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत सर्व पात्र सारथी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात येत होती. मात्र यावर्षी २०२३ पासून ही संख्या केवळ ५० केली त्यांनतर २०० करण्यात आली. १४०० विद्यार्थी पात्र आणि फक्त २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप असं कसं चालेल. असं जर सरकारने केलं तर, आम्ही आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे पण जर सरकारने भूमिका बदलली नाही तर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन करू.”

मराठा समाजास जर ख-या अर्थाने सक्षम करायचे असेल तर, शासनाने स्थापन केलेल्या सारथी संस्थेतील योजना या फक्त कागदावरच न राहता त्या प्रत्यक्षात आंमलात आल्या पाहिजेत, त्यादृष्टीने Ph.d करणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती देवून सरकारने समाजाच्या उन्नतीस किंबहुना देशाच्या संशोधन क्षेत्रास हातभार लावावा.

– सनदकुमार खराडे

Back to top button