Latest

PAK VS AUS : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला त्यांच्याच देशात चारली धूळ

अमृता चौगुले

लाहोर; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया (PAK VS AUS) दरम्यान लाहोरमध्ये खेळवण्यात आलेला तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने ११५ धावांनी जिंकला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांची मालिका १-० अशा फरकांनी जिंकली. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने अनिर्णित राहिले होते. तब्बल २४ वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. अखेरचा सामना जिंकत पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने इतिहासाची पुनरावृत्ती केली. ऑस्ट्रेलिया आता पर्यंत तीन वेळा पाकिस्तानचा दौरा केला आहे. या तिन्ही दौऱ्यात त्यांनी पाकिस्ताला धूळ चारली आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने (PAK VS AUS) पहिल्या डावात 391 धावा केल्या, त्यानंतर पाकिस्तानचा पहिला डाव 268 धावांवर आटोपला. त्यामुळे पहिल्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 123 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २२७ धावा करून डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 351 धावांचे लक्ष्य दिले होते. दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ केवळ 235 धावाच करू शकला.

24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान (PAK VS AUS) दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियन संघाने 1998 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला तेव्हा ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली होती. आता पुन्हा एकदा 2022 मध्ये, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानमध्ये 3 कसोटी सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिली आहे. अख्तरने ट्विट करून ऑस्ट्रेलियन संघाच्या रणनीतीला सलाम केला.

अख्तरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'धाडसी निर्णयांमुळे गौरव होतो, पाकिस्तानच्या कराची कसोटीनंतर काल घोषित केलेला डाव हा धाडसी निर्णय होता. त्या धाडसाने ऑस्ट्रेलियन संघाने सामना जिंकला. भारतीय उपखंडात पुन्हा एकदा चमकदार विजय नोंदविला.

ऑस्‍ट्रेलियाचा हा पाकिस्तानमध्‍ये तिसरा कसोटी मालिका विजय आहे. यापूर्वी 1960 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधार रिची बेनॉड होते. यानंतर 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका 1-0 ने जिंकली होती. मार्क टेलर हा ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार होता.

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानातील मालिका विजय

  • 1959/60 मध्ये 2-0 (रिची बेनॉड)
  • 1998/99 मध्ये 1-0 (मार्क टेलर)
  • 2021/22 मध्ये 1-0 (पॅट कमिन्स)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT