सिलचरमध्‍ये आलेल्‍या पुराचे संग्रहित छायाचित्र. 
Latest

Assam Floods : आसाममधील सिलचर येथील पूर मानवनिर्मित, बंधारा तोडल्‍याप्रकरणी दोघांना अटक

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  पूर म्‍हटलं की, आपण नैसर्गिक आपत्ती असाच उल्‍लेख करतो. मात्र आसाममधील सिलचर शहरात आलेला पूर हा मानवनिर्मित होता, अशी धक्‍कादायक माहिती पाेलीस तपासात समाेर आली आहे. ( Assam Floods )  बराक नदीची बेथुकांदी बंधारा तोडल्‍याप्रकरणी दोघांना अटक करण्‍यात आली आहे. मिथू हुसेन लस्‍कर आणि काबुल खान अशी त्‍यांची नावे आहेत, अशी माहिती स्‍थानिक पाोलीसांनी दिली. या दोघांनी बेथुकांदी बंधार का ताेडला, या प्रकरणात किती  जणांचा सहभाग हाेता, हे अद्‍याप पोलिसांनी स्‍पष्‍ट केलेले नाही.

याप्रकरणी  'आयएएनएस' वृत्तसंस्‍थेशी बोलताना पोलीस अधीक्षक रमणदीप कौर म्‍हणाले की, बेथुकांदी बंधारा तोडल्‍याप्रकरणी काबुल खान याला अटक करण्‍यात आली. त्‍याच्‍याकडे चौकशी केल्‍यानंतर लस्‍कर याच्‍यावरही कारवाई करण्‍यात आली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

Assam Floods : व्‍हायरल व्‍हिडीओमुळे प्रकार उघडकीस

आसामचे मुख्‍यमंत्री हिमंत बिस्‍वा सरमा यांनी यापूर्वीच स्‍पष्‍ट केले होते की, सिलचर शहरात आलेला पूर ही मानवनिर्मित आपत्ती होती. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्‍यांनी दिला होता. काबुल खान याने बंधारा ताेडत असतानाचा व्‍हिडिओ चित्रीत केला होता. या व्‍हिडीओमधील आवाज कोणाचा ते ओळखा, असे आवाहन त्‍याने केले होते. हा व्‍हिडीओ व्‍हायरल झाला. मुख्‍यमंत्री यांनी बेथुकांदी बंधारा परिसरात पाहणी केली. यावेळी पूरग्रस्‍तांनी हा व्‍हिडिओ मुख्‍यमंत्री सरमा यांना दाखवला होता.

व्‍हिडीओमधील आवाज हा काबुल खान याचा असल्‍याचे तपासअंती स्‍पष्‍ट झाले.  हे कृत्‍य सहा जणांनी मिळून केले असून, याप्रकरणाचा तपास सीआयडीचे अतिरिक्‍त पोलीस महासंचालक यांच्‍या मार्गदर्शनाखाली होईल. तसेच विशेष तपास पथकही चौकशीत सहकार्य करेल, असे मुख्‍यमंत्री सरमा यांनी स्‍पष्‍ट केले होते.

सिलचर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्‍या बेथुकंडी बंधारा तोडल्‍याप्रकरणी २४ मे रोजीच पोलिस ठाण्‍यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्‍हा दाखल झाला होता. जून महिन्‍यात मुसळधार पावसाने सिलचरला झोडपले. बंधारा तोडल्‍यामुळे पावसाचे पाणी शहरात शिरले. संपूर्ण शहराला पुराचा वेढा बसला. एक लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले. या मानवनिर्मित पूराची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्‍यमंत्री सरमा यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT