पुढारी ऑनलाईन डेस्क : Ashes Series : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटचा रोमांच हा क्रिकेटच्या इतर सर्व प्रकारांपेक्षा खूप वेगळा आहे. त्याचाच प्रत्यय सध्या सुरू असलेल्या ॲशेस (Ashes 2023) मालिकेतील लॉर्ड्स कसोटीत येत आहे. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 257 धावा करायच्या आहेत. पण त्यांच्या हातात केवळ 6 विकेट शिल्लक आहेत. त्यामुळे सामन्याचे पारडे कांगारू संघाकडे झुकल्याचे चित्र आहे. पण इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (ben stokes ashes 2019) अद्याप मैदानात नाबाद असून त्याच्याकडे सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. 2019 च्या ॲशेस मालिकेतील एका सामन्यात त्याने असाच करिष्मा केला होता.
2019 च्या ॲशेस मालिकेदरम्यान लीड्स कसोटीत असाच काहीसा थरार पाहायला मिळाला होता. ॲशेसमधील तो तिसरा कसोटी सामना होता. त्या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने संस्मरणीय खेळीच्या जोरावर इंग्लिश संघाला 1 विकेट राखून रोमांचक विजय मिळवून दिला होता.
2019 ॲशेस मालिकेची तिसरी कसोटी इंग्लंडच्या लीड्स मैदानावर खेळली जात होती. 25 ऑगस्ट हा त्या कसोटीचा शेवटचा दिवस होता. त्यावेळीही इंग्लिश संघ पाच कसोटींच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर होता. त्यानंतर लीड्स येथील तिसर्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीची निवड केली आणि इंग्लंडचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 179 धावांत गुंडाळला. त्यानंतर इंग्लंडचा संघ मैदानात आपला पहिला डाव खेळण्यासाठी उतरला. पण त्यांचा हा डाव अवघ्या 67 धावांवर कोसळला.
पहिल्या डावात 112 धावांची आघाडी मिळविल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात 246 धावा केल्या. त्यामुळे यजमान इंग्लंडला विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लंडचा पहिला डाव ज्या पद्धतीने गडगडका होता ते पाहता हे लक्ष्य यजमान संघासाठी खूप आव्हानात्म ठरणार असे वाटले. पण अष्टपैलू बेन स्टोक्सने कांगारूंच्या तोंडला फेस आणला आणि क्रिकेटच्या इतिहासातील अविस्मरणीय खेळी साकारली.
286 धावांवर इंग्लंडचे 9 गाडी बाद झाले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर उभा राहिला होता. पण क्रिजवर बेन स्टोक्स नांगर टाऊन उभा होता. त्याने एक टोक सांभाळत 11 व्या क्रमांकाचा फलंदाज जॅक लीच याच्याशी 76 धावांची ऐतिहासिक भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजय खेचून आणला होता. शेवटच्या विकेटसाठी झालेल्या 76 धावांच्या भागिदारीत जॅकने केवळ 1 धावेचे योगदान दिले होते. स्टोक्सने शतकी खेळी साकारत नाबाद 135 धावा फटकावल्या.