Latest

सिद्धू मुसेवाला प्रकरणातील संतोष जाधवचा काळाकुट्ट इतिहास; आंबेगाव तालुक्यात अनेक गुन्हे दाखल

अमृता चौगुले

मंचर/पुणे : पुढारी वृत्तसेवा – पंजाब येथील गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचे कनेक्शन आंबेगाव आणि जुन्नर तालुका निघाल्याने खळबळ उडाली आहे. सिद्धू मुसेवालाला गोळ्या घालणार्‍या लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीत आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव आणि जुन्नर तालुक्यातील सौरभ महाकाळ हे दोन कुख्यात गुन्हेगार आहेत, असे सोमवारी तपास यंत्रणांनी जाहीर केले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील पोखरी येथील मूळ गाव असलेला खतरनाक गुन्हेगार संतोष जाधव (वय 24) याच्यावर मंचर पोलिस ठाण्यात खून, पास्को, खंडणी आणि खुनी हल्ल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाईही करण्यात आली असून तो फरार आहे. संतोष जाधवचे वडील वारल्यानंतर आई धुणीभांडी करून आपला प्रपंच चालविण्यासाठी पोखरी या गावातून मंचर येथे आली. मंचरला जाधवची सासुरवाडीही आहे.संतोषला चुकीची संगत लागल्याने तो अल्पवयीन 16 वर्षांचा असतानाच त्याने कळंब येथील माजी सरपंच साळवे यांच्यावर खुनी हल्ला केला.

मंचर पोलिसांनी त्याला त्या वेळी अटक केली होती. त्यानंतर मंचर येथेच बाललैंगिक अत्याचार (पास्को)अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्या वेळीही पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणात तो जामिनावर सुटल्यावर 4 ऑगस्ट 2021 रोजी मंचर एकलहरेजवळील फकीरवाडी येथे ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले (वय 24, रा. पांढरीमळा, मंचर) याच्यावर गोळीबार करून त्याने त्याचा खून केला. या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांना आणि इतर दोघांना अटक झाली. परंतु त्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मास्टरमाइंड संतोष जाधव होता. तो तेव्हापासून फरार आहे. 6 महिन्यांपूर्वी त्याचा शोध घेण्यासाठी मंचर पोलिसांचे पथक हरियाणा-पंजाब व राजस्थान येथे गेले होते. मात्र, पोलिसांना चकवा देत संतोष जाधव फरार होण्यात यशस्वी ठरला. संतोष जाधव याच्यावर मंचर पोलिस ठाण्यात दीड महिन्यापूर्वी खंडणी मागितल्याचा गुन्हा त्याच्यासह इतर 4 साथीदारांवर दाखल आहे.

दुसरा गुन्हेगार सौरभ महाकाळ मढ पारगाव (ता. जुन्नर) येथील असून, त्याची आणि संतोष जाधवची मैत्री होऊन त्यांनी संघटित गुन्हेगारी करण्यास सुरुवात केली. त्या दोघांच्या पंजाब कनेक्शनफबाबत मंचर पोलिस तपास करीत असून, त्यांचा ङ्गमास्टरमाइंडफ कोण आहे त्याचा लवकरच उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.

सूर्य उगवण्याआधी तुला संपवतो असं स्टेटस

मंचरमधील ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याचा 4 ऑगस्ट 2021 ला गोळ्या झाडून खून करण्यापूर्वी संतोष जाधव याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्यात त्याने सूर्य उगवण्याआधी तुला संपवतोफ, असे स्टेटस सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध केले होते. त्याला ओंकारने उत्तरही दिले होते. या कारणावरून ओंकारची जाधवने बाइकवरून येऊन भरदिवसा गोळी घालून हत्या केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT