नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दि.21) नाशिक दौर्यावर आहेत. नाशिक विमानतळावर त्यांचे आगमन झाले असून पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांचे नाशिकनगरीत स्वागत केले. यावेळी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासह नाशिकमधील विविध विभागांचे अधिकारी, आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विभागीय आयुक्तालय परिसरातील सारथी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे.
त्यानंतर पळसे येथील नासाकाच्या गळीत हंगामाचा प्रारंभ ना. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. जीपीओसमोर दुपारी 12 वाजता बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री करतील. तसेच कालिदास कलामंदिर येथे दुपारी 1 वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याला ते हजेरी लावतील. दौर्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.