मुळशी-मुंबई थेट रस्त्याचा भूसंपादनाचा मार्ग मोकळा | पुढारी

मुळशी-मुंबई थेट रस्त्याचा भूसंपादनाचा मार्ग मोकळा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौक प्रकल्पामधील मुळशीकडून थेट मुंबईकडे जाण्यासाठी तयार करण्यात येणार्‍या मार्गाचा भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (दि. 20) भूसंपादनास परवनागी दिली. त्यामुळे महिनाभरात भूसंपादन होऊन उर्वरित रस्ता पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.
भूसंपादन अधिकार्‍यांनी केलेल्या निवाड्याविरोधात बाधित मालमत्ताधारकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने उर्वरित भूसंपादनाचे काम करण्यास परवानगी दिली. सद्य:स्थितीत पुलाच्या ठिकाणी मुंबई- सातारा पाच मार्गिका आणि सातारा- मुंबईसाठी तीन मार्गिका अशा एकूण आठ मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध  झाल्या आहेत.

दीड महिन्यात काम होणार पूर्ण
श्रृंगेरी मठाच्या जागेचा ताबा 1 सप्टेंबरला पुणे महानगरपालिकेकडून मिळाला असून सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. बावधनकडून सातार्‍याकडे जाणार्‍या मार्गिका सहाचे काम पुढील दीड महिन्यात पूर्ण करण्यात येईल. कोथरुड – वारजे-सातारा हा सेवा रस्ता महामार्गाला जोडला असून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.  एनडीए ते मुंबई या मार्गिका पाचचे काम प्रगतीवर असून पुढील 15 दिवसांत पूर्ण होईल. मुळशी ते कोथरुड या रस्त्यावरील जुन्या भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीवर असून पुढील दीड महिन्यात काम पूर्ण होणार आहे.

Back to top button