पारनेर : पुढारी वृत्तसेवा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले होते. काल दिवसभर सर्व मुख्य तपासण्या करण्यात आल्या होत्या. उर्वरित तपासण्या आज (दि.२६) रोजी सकाळी करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले असल्याने वयाच्या ८५ व्या वर्षीही आण्णा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉ. परवेझ ग्रँट आणि त्यांच्या सहकार्यांनी सांगितले आहे.
नियोजित सर्व तपासण्या पूर्ण झाल्याने डॉक्टरांनी आण्णा हजारे यांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार आण्णा राळेगणकडे रवाना झाले.
दरम्यान, हजारे रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. हजारे यांच्या सेवेला स्वयंसेवक श्यामकुमार पठाडे व संदीप पठारे होते.
दरम्यान आण्णा हजारे यांना रुग्णालयातून निरोप देण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकची संपूर्ण टीम उपस्थित होती. डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मखळे, डॉ. मुनोत यांनी सर्व तपासण्या केल्या.
काही दिवस त्यांना संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्याने किमान एक आठवडा कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्याचा आग्रह धरू नये, अशी माहिती राळेगणसिद्धी येथून संजय पठाडे यांनी दिली आहे.
रुबी हॉल क्लिनिकने जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार आण्णा हजारे यांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून छातीत दुखत होते.
त्यांना गुरूवारी रूबी हॉल क्लिनिकमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तेथे त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासले. यानंतर त्यांची 'इसीजी' तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये ह्रदयाच्या कार्यपध्दतीमध्ये काही बदल आढळून आले.
यानंतर त्यांच्यावर मुख्य ह्रदविकारतज्ज्ञ डॉ. परवेज ग्रँट आणि डॉ. सी.एन. मखळे यांनी त्यांच्या ह्रदयाची अँजिओग्राफी चाचणी केली.
असता त्यामध्ये त्यांच्या ह्रदयामधील रक्तवाहिनीत थोडे ब्लॉकेज दिसून आले. डॉ. परवेज ग्रँट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सूरू आहेत.