पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला असल्याचे वृत्त समोर येताच, राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. गुणवत्ता असूनही महाराष्ट्रातील युवांच्या तोंडाचा घास पळवला जातोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. (Anil Deshmukh On Government)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचा सिलसिला काही थांबायचं नावच घेत नाही असं दिसतंय. या आठवड्यात दोन मोठमोठे प्रकल्प गुजरातला पळविण्यात आले आहेत. हे सगळे मोठे प्रकल्प गुजरातलाच का जातात हा महाराष्ट्रातील युवांना पडलेला प्रश्न आहे". (Anil Deshmukh On Government)
महाराष्ट्रातील युवकांच्यात गुणवत्ता असूनही, महाराष्ट्रातील युवांच्या तोंडाचा घास पळवला जातोय; पण सगळे गद्दार मूग गिळून गप्प बसलेत. यांचा मी धिक्कार करतो, असा हल्लाबोल अनिल देशमुख यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केली आहे. (Anil Deshmukh On Government)
महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाण्याचे सत्र सुरूच असून, सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. देशातील पहिला ५६ कोटींचा पाणबुडी प्रकल्प निवती रॉक्स जवळील समुद्रात येणार होता. मात्र राज्य सरकारच्या अनास्थेमुळे या प्रकल्पाला चालना मिळू शकली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर केला आहे. (NCP On Government)