‘रिंगमास्टर’च्या तालावर नाचणारा वाघ : कोल्हे यांची अजित पवारांवर टीका | पुढारी

‘रिंगमास्टर’च्या तालावर नाचणारा वाघ : कोल्हे यांची अजित पवारांवर टीका

बारामती : पुढारी वृत्तसेवा : वाघ जेव्हा जंगलात असतो, तेव्हा तो जंगलाचा राजा असतो. सर्कशीतही वाघ असतो, पण तो ‘रिंगमास्टर’च्या इशार्‍यावर कसरती करतो, सध्या हे चित्र दिसून येत असल्याने काळजाला चरे पडतात. ज्या वाघावर आपण जीवापाड प्रेम केले त्याला ‘रिंगमास्टर’च्या तालावर नाचावे लागते, त्याला फक्त पिंजर्‍यात गुरगुरावं लागते, कुणीही येणारा- जाणारा त्याला दगड मारू शकतो… ही अवस्था वाघाची होते, तेव्हा वेदना होतात, अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे यांनी बारामतीतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

बारामती शहरात शेतकरी आक्रोश मोर्चानिमित्त आयोजित सभा शुक्रवारी (दि. 29) रात्री पार पडली. बारामतीतील या सभेत कोल्हे काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. कोल्हे यांनी आपल्या पाच-सहा मिनिटांच्या भाषणात अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. कोल्हे म्हणाले, डरकाळी फोडणारा वाघ जेव्हा पिंजर्‍यात जातो, तेव्हा काळजाला वेदना होतात. विकासासाठी गेल्याचे सांगणार्‍यांची अवस्था सर्कशीतील वाघासारखी झाली आहे.

‘मी पुन्हा येईल’ असे म्हणाले की, अडीच वर्षांनी यावे लागते. आणि आले तर परत तेही अर्धे यावे लागते, असा टोला कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे नाव न घेता लगावला. ’सब— करो सब— का फल मिठा होता हैं’ असे सूचक वक्तव्य कोल्हे यांनी केले. गुडघे टेकवायचे की संघर्ष करायचा या पर्यायात आम्ही संघर्ष निवडल्याचे ते म्हणाले. आमच्या शेतकरी आक्रोश मोर्चावर अनेक मंत्री अचानकच टीका करू लागले आहेत, कारण अनेक वतनदारांना वतने वाचवायची आहेत, रयतेच्या कल्याणाचे कोणाला देणे- घेणे नाही, असा ऐतिहासिक संदर्भ देत खासदार अमोल कोल्हे यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. वतन वाचवायचे असल्याने मांडलिकत्वाची भावना स्वीकारून दिल्लीश्वरांच्या नजरेला नजर भिडवून माझ्या महाराष्ट्राचे नुकसान का करताय, हे विचारण्याची हिंमत राहिली नाही, असा घणाघाती आरोप करत वतन वाचवायची तर ही धडपड नाही ना, अशी शंका येत असल्याचे ते म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा केली. बारामतीतील जुन्या आठवणींना उजाळा देत सुळे यांनी दा. सु. वैद्य यांनी लिहिलेल्या श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी- या कवितेच्या ओळी सादर केल्या. दिल्लीत पूर्णवेळ कृषिमंत्रीच नाही, हे दुर्दैवी असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी कांद्याच्या व आरक्षणाच्या प्रश्नावर दिल्लीत आवाज उठवावा, असे आवाहन केले. आपला वैयक्तिक कोणाला विरोध नाही, तर भाजपच्या चुकीच्या धोरणांना विरोध असल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा 

Back to top button