Latest

Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशी व्रत कधी आणि कसे करावे, जाणून घ्या सविस्तर

मोहन कारंडे

आडेली; विवेक गोगटे : अनंत म्हणजे जो कधीही मावळणार नाही… आणि कधीही संपणार नाही तो… आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्रीविष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या व्रताला अनंत चतुर्दशी व्रत (Anant Chaturdashi 2023) म्हणतात. राज्यात आज २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी व्रत मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे.

संबंधित बातम्या : 

सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते. अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi 2023) दिवशी विष्णूची अनंत या नावाने पूजा केली जाते. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत १४ वर्षे १४ गाठी असलेले रेशमी दोरा अनंत म्हणून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. हे सार्वत्रिक व्रत नसून कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत करण्यात येते.

अनंत चतुर्दशी  (Anant Chaturdashi 2023) या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णू असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षाचा असून या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू राहते. दर्भाचा शेषनाग करून त्याचे पूजन या दिवशी केले जाते. अनंताच्या पूजेत १४ गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. या व्रतासाठी १४ प्रकारची फुले, १४ प्रकारची फळे, १४ प्रकारचे धान्य व १४ प्रकारचे नैवेद्य दाखवतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते.

अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतनास्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णूरूपी शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस आहे. ब्रम्हांडात या दिवशी श्रीविष्णूच्या पृथ्वी, आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्तीरुपी लहरी कार्यमान असतात. श्रीविष्णूतत्त्वाच्या उच्चाधिष्ठीत लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरींचा तरी सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदू धर्मात योजना केली आहे. अनंत पूजनात भोपळ्याचे घारगे आणि वड्यांचा नैवेद्य….
भोपळ्यातील आपतत्वात्मक रसात्मकता ही क्रियाशक्तीला चालना देणारी असते तसेच भोपळ्यात बद्ध असणारे सूक्ष्म वायुकोष हे ब्रम्हांडातील क्रियाशक्तीच्या लहरींना स्वतःत घनीभूत करणारे असतात भोपळ्याच्या सहाय्याने बनवलेले घारगे आणि वडे यात पूजास्थळी कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी अल्प कालावधीत स्थानबद्ध होऊ शकतात. क्रियाशक्तीने भारीत नैवेद्य ग्रहण केल्याने देहातही त्याच पद्धतीचे बलवर्धकतेला पूरक असे वायुमंडल निर्माण होण्यास सहाय्य मिळत असल्याने अनंत पूजनात भोपळ्याचे घारगे आणि वड्यांचा नैवेद्य दाखवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT