Ganpati Visarjan | सिंधुदुर्गात नऊ दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप | पुढारी

Ganpati Visarjan | सिंधुदुर्गात नऊ दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्हाभरात बुधवारी सायंकाळी नऊ दिवसांच्या श्री गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत बाप्पाचा जयघोष करीत श्री गणेश मुर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.

गेले नऊ दिवस घरोघरी पूजन करण्यात आलेल्या श्री गणेश मुर्तींचे बुधवारी सायंकाळी नदी, तलाव, ओहळ तसेच समुद्र आदी ठिकाणी भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. विसर्जन ठिकाणी प्रारंभी आरती करण्यात आली त्यानंतर श्रींना निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष यावेळी करीत बाप्पांना निरोप देण्यात आला. शहरासह ग्रामीण भागात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. सायंकाळ पासून रात्री उशिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत ठिकठिकाणी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग आदी आठही तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत नऊ दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.

Back to top button