पुणे; पुढारी वृत्तसेवा : येरवडा कारागृहातील बंदी नानासाहेब शंकरराव गायकवाड याच्यावर एका बंदी गुन्हेगाराने कारागृहामध्येच वार केल्याची शुक्रवारी (दि.३) घटना घडली आहे. हल्लेखोराने पत्र्याने गायकवाडच्या गालावर वार केले असून यात गायकवाड हा किरकोळ जखमी झाला आहे. आरोपीने कारागृहातच केलेला हा दुसरा हल्ला आहे. गायकवाडवर जादू टोण्याचा वापर करून सुनेचा छळ, खंडणी तसेच मोक्का आदि गुन्हे दाखल आहेत.
सुरेश बळीराम दयाळू (३०, रा. बिबवेवाडी) याच्यावर जखमी केल्याप्रकरणी भादवि कलम ३२४ नुसार येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारागृह पोलिस हवालदार सुभाष मानसिंग दरेकर (४५) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नानासाहेब गायकवाड याच्यावर जादू टोणा, सुनेचा छळ, खंडणी आणि मोक्का तसेच इतर कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. तो सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी म्हणून आहे. तर कोयत्याचा तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून बोगद्यात दाम्पत्यांना लुटणार्या टोळीतील सुरेश दयाळू हा सदस्य असल्याबाबत त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली होती.
शुक्रवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहातील हॉस्पीटल विभक्त विभागा ७ येथील न्यायालयीन बंदी सुरेश दयाळू याने लोखंडी तुकड्याच्या साह्याने नानासाहेब गायकवाड याच्या उजव्या गालावर हल्ला केला. या हल्ल्ल्यात गायकवाड जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे निरीक्षक उत्तम चक्रे, पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे यांनी येरवडा कारागृहात जाऊन घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी दयाळूवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक कैलास डुकरे करत आहे. दरम्यान हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याचा पोलिस तपास करत आहे.
एप्रिल २०२२ मध्येही सुरेश दयाळूकडून हल्ला
18 जानेवारी 2022 रोजी कारागृहात सुरेश दयाळू याने दुसरा कैदी राकेश उर्फ राक्या जॉनी सकट याच्या सोबत मिळून एका कैद्याच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले होते. सिगारेटची राख अंगावर पडल्याच्या वादावादीतून त्याने हा हल्ला केला होता. या प्रकरणी कैदी अमोल कालीदास लगस याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
हे वाचलंत का?