पुणे: बालविवाहप्रकरणी वधू-वरांसह साक्षीदारांवर गुन्हा, वयाचा खोटा दाखला देत केले लग्न; आळंदी येथील घटना | पुढारी

पुणे: बालविवाहप्रकरणी वधू-वरांसह साक्षीदारांवर गुन्हा, वयाचा खोटा दाखला देत केले लग्न; आळंदी येथील घटना

आळंदी, पुढारी वृत्तसेवा: लग्नासाठीची वयोमर्यादा पूर्ण नसताना वयाचा खोटा दाखला तयार केला. त्यानंतर नवी मुंबई येथून आळंदीत येत एका मंगल कार्यालयात तो दाखला जमा करीत लग्न करणाऱ्या वधू-वरांसह त्यांच्या तीन साक्षीदारांवर आळंदी पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३ जानेवारी रोजी घडला. वधू-वरांसह साक्षीदार अक्षय सुनील साबळे (वय २५), सोमनाथ नाथा उघडे (वय २५) व आकाश दादाराव नागदिवे (वय २४, सर्वजण रा. नवी मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय अधिकारी सोनाली धुमाळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वधू-वर आणि त्यांचे तीन साथीदार हे सर्वजण लग्न करण्यासाठी नवी मुंबईहून आळंदी येथे 13 जानेवारीला आले होते. त्यानंतर त्यांनी तेथील एका मंगल कार्यालयात लग्न केले. मात्र, हा बालविवाह असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वधूचे वय १९ वर्षे असून, वराने दाखल केलेल्या वयाच्या दाखल्यानुसार त्याचे वय २१ दिसून येत होते. मात्र, प्रत्यक्षात त्याने दिलेला दाखला हा बनावट होता. त्याचे खरे वय हे १९ वर्षे असल्याचे समोर आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार आळंदी पोलिसांनी वधू-वरांसह त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला.

आळंदीत बालविवाह वाढले

गेल्या काही दिवसांपासून आळंदीत बालविवाह होण्याचे प्रमाण वाढले असून, कायदा धाब्यावर बसविल्याचे चित्र आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जन्माचा दाखला, अशा एका वयाच्या पुराव्यावर देखील आळंदीत लग्ने लावली जातात. याबाबत कठोर नियम नाही. कागदपत्रे खोटी की खरी ठरवणारी अशी कोणतीही यंत्रणा आळंदीत नाही. पोलिसांना देखील अशा प्रकरणात कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश येताना दिसून येत आहे. अनेकवेळा अशा घटना दाबण्याचे प्रयत्न होत असल्याची सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

Back to top button