पुणे: रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात जाताना पकडला | पुढारी

पुणे: रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात जाताना पकडला

बेल्हे, पुढारी वृत्तसेवा: स्वस्त धान्य दुकानातील ३५०० किलो तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असताना पेमदरा, शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनी पकडल्याने रेशन दुकानातील काळा धंदा पुन्हा एकदा उजेडात आला आहे.

गरिबांसाठी शासनातर्फे रेशन दुकानांतून मिळणाऱ्या तांदूळ, गहू व इतर जीवनावश्‍यक वस्तू लाभार्थींना न देता रेशन दुकानदारांकडून हे धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. अशा घटना अनेकवेळा जुन्नर तालुक्यात घडूनही महसूल प्रशासन या घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.

याबाबत ग्रामस्थ आणि पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास शिंदेवाडी येथील स्वस्त धान्य दुकानाचे रेशनिंग खाली करून पेमदरा गावाकडे रेशनिंग देण्यासाठी जात असताना शिंदेवाडी गावच्या हद्दीत ट्रक (एमएच १४, एएस ९०६६) मधील ५० किलो वजनाची ७० पोती तांदूळ एका पिकअप टेम्पोमध्ये (एमएच १४, एचयू ५८४८) भरताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. शिंदेवाडी ग्रामस्थांनी टेम्पो आणि ट्रक पकडून पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलिस उपनिरीक्षक अनिल पवार यांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी जुन्नर तहसीलचे पुरवठा अधिकारी रवींद्र दळवी यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावून घटनेचा पंचनामा केला. दळवी यांनी ७० गोणी तांदूळसह ट्रक-टेम्पो आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिला. मात्र, त्यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात सायंकाळी सात वाजेपर्यंत फिर्याद दिली नसल्याने आळेफाटा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Back to top button