नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडला (एनसीईएल) आतापर्यंत ७००० कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. निर्यातीतून मिळणारा ५० टक्के नफा शेतकऱ्यांना आणि सहकारी संस्थांना दिला जाईल, असे प्रतिपादन गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज केले. नैसर्गिक शेतीच्या प्रोत्साहनाचा दाखला देताना अमित शाह यांनी सांगितले, की आतापर्यंत १२ लाख शेतकरी नैसर्गिक शेती करत आहेत. २०२७ पर्यंत शेतकऱ्यांची ही संख्या दोन कोटी पर्यंत पोहोचेल. (Amit Shah)
सहकारी क्षेत्राकडून होणाऱ्या निर्यातीबाबत राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड (एनसीईएल) द्वारे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी हे प्रतिपादन केले. राष्ट्रीय सहकार निर्यात लिमिटेडच्या स्थापनेमागे सहकारी क्षेत्राची निर्यात वाढविणे आणि शेतकऱ्यांची समृद्धी वाढविणे हे उद्दीष्ट आहे, असे सहकार मंत्री म्हणाले. याप्रसंगी राष्ट्रीय सहकार निर्यात लिमिटेडचा लोगो, संकेतस्थळ आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन त्यांच्याहस्ते झाले. तसेच सदस्यता प्रमाणपत्रांचेही वितरण झाले. वाणिज्य मंत्री पीयुष गोयल हे देखील यावेळी उपस्थित होते. (Amit Shah)
सहकार मंत्री अमित शाह म्हणाले, की राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेची स्थापना निर्यात वाढविणे, शेतकऱ्यांना समृद्ध बनविणे, पीकपद्धतीमध्ये बदल घडविणे, सेंद्रीय उत्पादनांसाठी वैश्विक बाजारपेठ उपलब्ध करणे, जैवइंधनाच्या बाजारपेठेत भारताचा प्रवेश करणे तसेच सहकार क्षेत्राला बळकट करणे यासाठी झाली आहे. राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडद्वारे सर्व सेंद्रीय उत्पादनाचे प्रमाणीकरण, विपणन आणि पॅकेजिंग करून आंतरराष्ट्रीय बाजारात पाठविण्याचे काम होईल. यातून शेतकऱ्यांना मिळणारा नफा वाढेल आणि भारतीयांसह जगभरातील लोकांचे आरोग्य चांगले राहण्याला मदत होईल. नैसर्गिक शेतीसाठी आतापर्यंत १२ लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. २०२७ पर्यंत दोन कोटी शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या शेतकऱ्यांना गहू, साखर किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीतून मिळणारा लाभ कमी आहे. राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडमार्फत जी काही निर्यात होईल, त्यातील किमान ५० टक्के नफा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था तयार करण्यात आली आहे. मल्टी स्टेट को-ऑप बीज सोसाइटी, मल्टी स्टेट को-ऑप ऑर्गेनिक सोसाइटी आणि मल्टी स्टेट को-ऑप एक्सपोर्ट सोसाइटी या पंतप्रधान मोदींनी बनविलेल्या तीन सहकारी संस्था आपले स्थान बळकट करतील आणि वैश्विक बाजारपेठेत दमदारपणे उभ्या राहतील, अशी ग्वाही देखील अमित शाह यांनी दिली. तर, एनसीईएल मुळे निर्यातीला चालना मिळेल तसेच ग्रामीण भागाच्या विकासालाही हातभार लागेल. अर्थात, सहकारी संस्थांनी निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करणाऱ्या दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीवर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी व्यक्त केली.