पुणे : पुण्यात दोन दादा म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात कुरघोडीच्या राजकारणाचा अध्यायच सुरू असल्याचे शनिवारी दिसून आले. पवार यांनी भाषणातून लवकर वेळेवर उठायला शिका. कार्यक्रमास वेळेत जायला शिका, असे वक्तव्य केले. त्यामुळे हे वक्तव्य नेमके कुणासाठी होते ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमास दोघे निमंत्रित होते. मात्र, चंद्रकांत पाटील हे कार्यक्रमाला पोहचण्यापूर्वीच अजित पवारांनी कार्यक्रम सुरू केल्याने कुरघोडीचे राजकारण घडल्याच्या चर्चा होत आहे. कार्यक्रमाची वेळ दहा वाजताची होती. चंद्रकांत पाटील यांना उशीर होत असल्याने त्यांच्यासाठी न थांबता अजित पवार यांनी कार्यक्रमास सुरुवात केली.
या वेळी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, वेळेत उठायला शिका, चांगल्या सवयी लावा, कामाला लवकर सुरुवात करा, कार्यक्रमास वेळेत पोहचा. उगीच ढेरी सुटलीय असं नको. हा सल्ला माझ्यासह सगळ्यांना आहे. मात्र, या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील उशिरा पोहचल्याने त्यांना अजित पवार यांनी टोला लगावल्याचे बोलले जात आहे.
चंद्रकांत पाटील म्हणतात… ओरखडा येऊ न देता, चिमटा काढायचा, असा अजित पवार यांचा स्वभाव आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सूचनेचे पालन करावे. अजितदादांना जे भाषणातून सांगायचे होते, तेच मलाही सांगायचे आहे. मी अजित पवार यांच्या भाषणाला मम म्हणतो, असे म्हणत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांच्या वक्तव्याला उत्तर दिले.
हेही वाचा