पुढारी ऑनलाईन: एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर प्रवाशाने लघुशंका केल्याच्या घृणास्पद प्रकार समोर आला होता. याप्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा याच्या वकिलाने आपल्या अशिलाच्या बाजूने युक्तिवाद केला आहे. संबंधित आरोपीच्या वकिलाने आपली कायदेशीर बाजू मांडताना म्हटले आहे की, ज्या महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडला ती वैद्यकीय स्थितीत होती. त्यामुळे तिने स्वत:च स्वत:च्या अंगावर लघुशंका केली.
संबंधित आरोपीच्या वकीलाने अशाप्रकारे केलेल्या युक्तिवादामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा पेटले आहे. या वादात आता टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनीही उडी घेतली आहे. असा युक्तिवाद केल्याबद्दल शंकर मिश्रा यांच्या वकिलावरही कारवाई झाली पाहिजे, असे टीएमसी खासदाराने म्हटले आहे. यामुळे शालीनतेला तडा गेल्याचेही मोईत्रा यांनी या प्रकरणात म्हटले आहे.
टीएमसी खासदाराने याप्रकरणी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "शंकर मिश्रा यांच्या वकिलाचा युक्तिवाद हा कायदेशीर इतिहासातील सर्वात विक्षिप्त बचाव आहे." मात्र, नंतर महुआ मोइत्राने तिचे ट्विट डिलीट केले.
या घृणास्पद घटनेनंतर टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांनी एक निवेदन प्रसिद्ध करुन याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. एन चंद्रशेखरन यांनी निवेदनात म्हटलं आहे की, "26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाने उड्डाण केलेल्या एआयआय 02 विमानात घडलेली घटना माझ्यासाठी आणि एअर इंडियामधील माझ्या सहकाऱ्यांसाठी वैयक्तिक वेदनादायक बाब आहे. याप्रकरणी एअर इंडियाचा प्रतिसाद अधिक जलद असायला हवा होता. आम्ही परिस्थिती योग्यरितीने हाताळण्यास अपयशी ठरलो."
हे ही वाचा :