अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, नगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
दरम्यान, आग प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार असून मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना सरकार मदत करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे.