बंगळूर; वृत्तसंस्था : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुर्वणपदक विजेता, अर्जुन पुरस्काराचा मानकरी बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ज्युनिअर स्पर्धेत खेळण्यासाठी त्याने आपल्या वयाबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लक्ष्य सेन, त्याचे आई-वडील, भाऊ आणि प्रशिक्षक यांच्याविरुद्ध बंगळूरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. बंगळूर पोलिसांत एम. जी. नागराजा यांनी तक्रार दाखल केली. ते एक बॅडमिंटन अॅकॅडमी चालवतात. नुकतेच बंगळूरमधील न्यायालयाने 21 वर्षीय लक्ष्य सेन याच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्यात यावी, असे आदेश दिले होते. (Lakshya Sen)
एफआयआरमध्ये लक्ष्य, त्याचे प्रशिक्षक विमल कुमार, लक्ष्यचे वडील धीरेंद्र सेन, त्याचा भाऊ चिराग आणि आई निर्मला सेन यांच्या नावाचा समावेश आहे. चिराग स्वतः बॅडमिंटनपटू आहे. धीरेंद्र भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, नागराजांचा आरोप आहे की, प्रशिक्षक विमल यांनी लक्ष्यच्या आई-वडिलांच्या सहकार्याने 2010 मध्ये जन्म प्रमाणपत्र तयार केले होते. ज्यामध्ये चिराग आणि लक्ष्य यांच्या वयाबाबत चुकीची माहिती देण्यात आली. यामुळे लक्ष्यला ज्युनिअर स्पर्धेत भाग घेता आला. वयाबाबत त्याने वस्तुनिष्ठ माहिती दिली असती तर तो स्पर्धेसाठी अपात्र ठरला असता. (Lakshya Sen)
लक्ष्य आमच्या अॅकॅडमीत आला. मी त्याला 2010 पासून इतर मुलांप्रमाणे प्रशिक्षण दिले. एक कुटुंब जाणीवपूर्वक अॅकॅडमी आणि माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व आरोप निराधार आहेत, असा दावा लक्ष्य सेनेचे प्रशिक्षक विमल कुमार यांनी केला आहे.
अधिक वाचा :