नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावरुन लोकसभेत (Parliament Monsoon Session) निर्माण झालेला पेच कायम आहे. सर्व कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी सदनात जोरदार राडेबाजी केली. यामुळे सभागृहाचे बहुतांश कामकाज वाया गेले.
लोकसभेत (Parliament Monsoon Session) सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाल्या झाल्या विरोधी सदस्यांनी मणिपूरच्या मुद्यावरुन घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले. दुपारच्या सत्रात गदारोळात पीठासीन अधिकाऱ्याकडून कामकाज पुढे रेटण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी मांडलेले अनुसूचित जमाती तिसरी सुधारणा विधेयक तसेच मंत्री अनुराग ठाकूर यांनी मांडलेले सिनेमॅटोग्राफिक सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. यानंतर गदारोळ जास्तच वाढल्याने कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
दरम्यान, विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा न घेता वेगवेगळी विधेयके मांडून केंद्र सरकार संसदेचा अपमान करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. सरकारने सर्वप्रथम अविश्वास प्रस्तावावर चर्चा करणे गरजेचे आहे, असे सांगतानाच भाजपच्या खासदारांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करावी, असा सल्ला चौधरी यांनी दिला.
हेही वाचा