Latest

Aditya Thackeray : राज्यात गद्दारांचे सरकार,…लवकरच कोसळणार ; मनमाड येथील मेळाव्यात आदित्य ठाकरेंचे टीकेचे बाण

गणेश सोनवणे

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

गद्दारांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. ४० गद्दार नजरेला नजर मिळवू शकत नाहीत. गद्दारांना उत्तरे देण्यास आपण कटिबध्द नाही. गद्दारांना हिंदुत्वाचा पुळका आताच का आला? सत्तेत होते तेव्हा अडीच वर्ष गप्प का राहीले? असे अनेक सवाल युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटीर आमदारांना केले…..

मनमाड येथे आयोजित शिवसंवाद यात्रेत आदित्य बोलत होते. ते म्हणाले, पक्षाचा आदेश सर्वोच्च असतो तो तुम्ही का पाळला नाही? उद्धव ठाकरे यांच्याशी तुम्ही गद्दारी केली आहे. शिवसैनिक कदापि तुम्हाला माफ करणार नाहीत.

शिंदे सरकारवर टीका करत आदित्य म्हणाले की, हे सरकार कोसळणारच आहे. आजच लिहून देतो. हे तात्पुरते सरकार आहे. अल्पमतातील सरकार आहे. मी विकलो गेलो नाही. आमदार विकले गेले आहेत. राज्याचे राजकारण घाणेरडे झाले आहे. माणुसकी तोडून राजकारण सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे भेटत नव्हते असा आरोप करण्यात आला परंतु त्यांच्या दोन गंभीर शस्त्रक्रिया झाल्या म्हणून भेटले नसल्याचे आदित्य यांनी स्पष्टीकरण दिले. उद्धव साहेबांचे दुःख मी बघितले आहे. मुलगा म्हणून मी जवळ तेव्हाही होतो आणि आजही आहे. आजारी असतांनाही उद्धव ठाकरेंनी काम थांबवले नाही. महाराष्ट्राची सेवा थांबविली नाही. आजारपणाचा फायदा घेत गद्दारांनी आमदार जमविले. आमदार विकले गेले असा आरोप आदित्य यांनी याप्रसंगी केला.

याप्रसंगी मोठ्या संख्येने शिवसेना समर्थकांची गर्दी होती. त्यांना आदित्य म्हणाले की, गद्दारांना पाठिंबा देणार का ? की शिवसेनेला पाठबळ देणार. गद्दार सोडून गेले; शिवसैनिक आणि कार्यकर्ते मात्र इकडेच आहेत..आजारपणाचा फायदा घेत गद्दारांनी आमदार जमविले. आमदार विकले गेले असा आरोप आदित्य यांनी याप्रसंगी केला.

पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा. विधानसभा लोकसभेत पुन्हा ताकद दाखवा. तुम्हा शिवसैनिकांना पुन्हा नव्याने संधी उपलब्ध होणार आहे असे म्हणत नव्या चेहऱ्यांना आगामी निवडणुकीत संधी देणार असल्याचे आदित्य यांनी या दौऱ्यात जाहीर केले. या वेळी मंचावर आमदार नरेंद्र दराडे, जयंत दिंडे, जगन्नाथ धात्रक, राजेंद्र देशमुख, गणेश धात्रक, दिलीप सोळसे, संतोष गुप्ता, मयूर बोरसे, अल्ताफ खान, पिंटू नाईक, संजय कटररिया, सुनील पाटील, राउफ मिरझा, रमेश हिरण, सुधाकर मोरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT