Joshua D'Souza : गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी जोशूआ डिसोझा यांची निवड

पणजी : पुढारी वृत्तसेवा : म्हापसा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे युवा आमदार जोशूआ डिसोझा (Joshua D’Souza) यांची आज (दि.२२) गोवा विधानसभेचे उपसभापती म्हणून २४ विरुद्ध १२ मतांनी निवड झाली. माजी उपसभापती सुभाष फळदेसाई यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गेले काही महिने गोवा विधानसभेचे उपसभापतीपद रिक्त होते. त्यानंतर गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आणि आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली.
सभापती रमेश तवडकर यांनी उपसभापतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर भाजपाचे आमदार गणेश गावकर यांनी जोशूआ डिसोझा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. आमदार कृष्णा साळकर यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. विरोधी पक्षातर्फे उपसभापती पदासाठी डिलायला लोबो यांनी अर्ज सादर केला होता. त्यांच्या नावाचा प्रस्ताव आमदार अॅड. कार्लोस फेरेरा यांनी मांडला. त्यांना गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभापती तवडकर यांनी उपसभापतीपदाची निवडणूक मतदानाला टाकली असता जोशूआ डिसोझा यांना २४ मते प्राप्त झाली.
सभापती रमेश तवडकर हे भाजपाचे आमदार असले तरी सभापती असल्यामुळे ते मतदानात भाग घेऊ शकले नाहीत. डिसोझा यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवार डिलायला लोबो यांना फक्त १२ मते मिळाली. विरोधक असलेले आम आदमी पक्षाचे २ आमदार व रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे १ आमदार तटस्थ राहिल्यामुळे विरोधी १५ पैकी १२ मतेच लोबो यांना मिळाली. डिसोझा यांची बहुमताने निवड झाल्याची घोषणा तवडकर यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी जोशूआ यांना त्यांच्या आसनावर बसवले, व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. जोशूआ डिसोझा हे माजी उपमुख्यमंत्री व म्हापसाचे माजी आमदार अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र असून म्हापसा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा ते भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत.
हेही वाचलंत का ?
- African swine fever | केरळमध्ये आफ्रिकन स्वाईन फिव्हरचा उद्रेक, डुकरांना मारण्याचे निर्देश
- मुंबईत स्वाईन फ्लूचे (Swine Flu) ४ रुग्ण गंभीर; एकूण ११ जणांना स्वाईन फ्लुची लागण
- President Election : मुर्मू यांना 18 राज्यांमधील 126 आमदार आणि 17 खासदारांकडून ‘क्रॉस वोटिंग’!