मुंबई: पुढारी वृत्तसेवा : काचेच्या बाटलीत फटाके फोडण्यास विरोध केल्याच्या रागातून ३ अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गोवंडीमध्ये घडली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 24) दुपारी दोनच्या सुमारास येथील नटवर पारेख कंपाउंडमधील मोकळ्या मैदानात12 वर्षीय मुलगा हा त्याचा 15 वर्षीय भाऊ आणि 14 वर्षीय मित्रासोबत काचेच्या बाटलीत फटाके फोडत होता. यावेळी सुनील नायडू (वय 21) याने त्याला काचेच्या बाटलीत फटाके फोडण्यास विरोध केला. याचा राग आल्याने तिघांनीही नायडू याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर यातील 12 वर्षीय मुलाने त्याच्याजवळील चाकूने नायडूच्या मानेवर सपासप वार करून पळ काढला.
या हल्ल्यात नायडू हा गंभीर जखमी झाला होता. स्थानिकांनी नायडूला तत्काळ उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी नायडूला दाखलपूर्व मृत घोषित केले. अखेर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले आहे. तर 12 वर्षीय मुलाचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?