Latest

परभणी : लग्नपत्रिकेसोबत पुस्तक भेट, गंगाखेडच्या जामगे परिवारांचा अनोखा उपक्रम

अनुराधा कोरवी

गंगाखेड : पुढारी वृत्तसेवा; 'वाचाल तर वाचाल' ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो. आजच्या काळात मनुष्याच्या ठिकाणी असलेले ज्ञान हे त्याची सर्वात मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साहाय्याने तो सुबुद्ध व प्रगल्भ तर होतोच. परंतु, त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. सद्यस्थितीतील हा नेमका धागा पकडून गंगाखेड येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा भाजपचे परभणी जिल्हा सरचिटणीस (संघटन) बाबासाहेब जामगे यांच्या परिवाराकडून त्यांची परदेशात उच्च शिक्षण घेत असलेली लेक डॉ. भाग्यश्री (ऑस्ट्रीया) व जावई डॉ. राहुल (जर्मनी) यांच्या लग्नपत्रिकेसोबत सर्व नातेवाईक, आप्तेष्ट व मित्रपरिवारांस एक पुस्तक भेट देण्यात आले. हा अनोखा उपक्रम राबविल्याने जामगे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शहरातील भाजपचे नेते बाबासाहेब जामगे हे व्यक्तिमत्व मुळात सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रासह कलाकार आहेत. आपल्या अनोख्या कार्यपद्धतीने सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात त्यांची मोठी छाप आहे. ऑस्ट्रिया देशातील व्हिएन्ना येथे जैविक तंत्रज्ञानात शास्त्रज्ञ असलेल्या डॉ. भाग्यश्री बाबासाहेब जामगे व जर्मनीतील जैविक तंत्रज्ञान शास्त्रज्ञ असलेले जावई डॉ. राहुल वैंकटराव भारद्वाज यांचा विवाह सोहळा शहरात शुक्रवारी( दि.२७ जानेवारी) रोजी होणारा आहे. या विवाहसोहळ्याची एका आगळ्यावेगळ्या कारणाने सध्या शहर, तालुक्यात व जिल्हाभरात चर्चा आहे. जामगे परिवारांकडून या विवाह सोहळ्याच्या लग्नपत्रिकेसोबत प्रत्येकाला एक पुस्तक भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने पुस्तक भेटीचा हा अनोखा उपक्रम अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.

१२ लाख रुपयांची ४ हजार पुस्तके भेट

या विवाह सोहळ्यानिमित्ताने बाबासाहेब जामगे यांनी तब्बल १२ लाख रुपयांची ४ हजार पुस्तके पुणे व दिल्ली येथून खरेदी केली आहेत. साधारणतः १०० ते १८०० रुपये किमतीची ही पुस्तके यानिमित्ताने खरेदी करण्यात आलेली आहेत. मुलीच्या लग्नासाठी इतरत्र वारेमाप, अवास्तव खर्च करणाऱ्या पालकांसाठी यातून निश्चितच आगामी काळात सकारात्मक प्रेरणा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT