मुंबई : धारावीत पत्नीसमोर पतीची निर्घृण हत्या | पुढारी

मुंबई : धारावीत पत्नीसमोर पतीची निर्घृण हत्या

धारावी; पुढारी वृत्तसेवा :  दोन तरुणांनी धारदार चाकूने पत्नीसमोर पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना धारावी नव्वद फूट रस्त्यावरील विजय नगर इमारतीसमोर मंगळवारी रात्री घडली आहे. मोहम्मद जाहिद (२६) असे मयत तरुणाचे नाव आहे. धारावी पोलिसांनी फरार आरोपी अलिहुसेन अलिहासन खान वय (२४) व त्याच्या साथीदारावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी पत्नी मलकासबा मोहम्मद जाहिद हिने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसापूर्वी बॅडमिंटनचा कॉक उद्यानातील सुरक्षा रक्षकांसाठी बांधण्यात आलेल्या खोलीच्या छपरावर पडला. ते पाहून अलिहुसेन आणि त्याच्या साथीदारांनी छपराचा पत्रा तोडून कॉक काढत असताना सुरक्षा रक्षक मोहम्मद ने त्यांना हटकले. यावरून वाद विकोपाला जाऊन त्यांच्यात हाणामारी झाली. झालेल्या झटापटीत अलिहुसेनचे डोके फुटले. सायन पोलिसांनी जखमी अलिहुसेन ला रुग्णालयात पाठवून सुरक्षारक्षक मोहम्मदला पोलिसांनी अटक केली. पतीला अटक झाल्याची माहिती मिळताच पत्नी मलकासबाने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या पतीला सोडविले. आरोपी सुटल्याची माहिती मिळताच अलिहुसेन व त्याच्या साथीदाराने मंगळवारी रात्री मोहम्मद आपल्या पत्नीसह दुचाकीवरून घराकडे निघाला असताना अडवून त्याला दुचाकीवरून खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली. मोहम्मदच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच अलिहुसेनने चाकूने गळ्यावर वार केला. तिने तडफडत पडलेल्या पतीला घेऊन तिने सायन रुग्णालय गाठले. परंतु काही मिनिटातच त्याने अखेरचा श्वास घेतला.

Back to top button