लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा : हवेली तालुक्यातील तहसील कार्यालयासह इतरही सरकारी कार्यालयांत काही सुपारीबाज दलालांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या दलालांनी महिला अधिकारी आणि कर्मचारी यांना 'टार्गेट' केल्याने महिलावर्गात तणावाचे वातावरण आहे. बेकायदा कामे करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबावतंत्र वापरले जात आहे. अशी कामे करण्यास नकार देणार्या महिला अधिकारी आणि कर्मचारी यांना वैयक्तिक त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. तथ्यहीन आरोप करून बदनामी केली जाते. चारित्रहनन केले जाते. या प्रकारामुळे महिला अधिकारी आणि कर्मचारी मानसिक तणावाखाली गेल्या असल्याने महसूल विभागात त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणी वाली राहिला नाही, अशी स्थिती आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याच हवेली तालुक्यात महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबाबत होत असलेल्या या प्रकाराची आयोग दखल घेईल का? असा प्रश्न विचारला जात आहे.
संबंधित बातम्या :
नियमबाह्य कामे करण्यास नकार देणार्या महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या वरिष्ठांना खोट्या तक्रारी करण्याच्या धमक्या दिल्या जातात तसेच बेकायदा प्लॉटिंगच्या नोंदींची कंत्राटे या व्यावसायिकांकडून घेऊन सातबारावर नोंदी करून लाखो रुपयांचा मलिदा हे सर्व दलाल खात आहेत व पैसे घेतल्याचा आरोप महिला अधिकारी सहन करीत आहेत. काही दलाल तर कार्यालयातच धमकी देण्याचे धाडस करीत आहेत. या महिला अधिकारी आणि कर्मचार्यांना कोणी वाली राहिला नाही, अशी भावना निर्माण झाली आहे.
मी हवेली तालुक्यातील महिला अधिकारी आणि कर्मचार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जे कोणी त्रास देत असतील, त्यांच्या तक्रारी कराव्यात. प्रशासकीय पातळीवर योग्य दखल घेतली जाईल.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी