Latest

पूर्व लडाखमध्ये ‘ड्रॅगन’ची पुन्हा कुरापत! LAC जवळ चिनी लढाऊ विमानाची घुसखोरी

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : चीनच्या हवाई दलाने पुन्हा एकदा पूर्व लडाखमध्ये कुरापत काढली आहे. चीनच्या लढाऊ विमानाने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय सैन्याच्या अगदी जवळून उड्डाण केल्याची माहिती समोर आली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही घटना घडली असून चीनच्या या कृत्यामुळे सीमेवर पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ही घटना खूप गंभीर अथवा अधिक चिंता वाढवणारी नसली तरी प्रस्थापित नियमांनुसार चीनच्या या कृत्याला भारताकडून विरोध करण्यात आला आहे. यामुळे दोन देशांमध्ये सीमेवर लष्करी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या लढाऊ विमानाने गेल्या महिन्यात एलएसीजवळील भारतीय चौकीच्या अगदी जवळून उड्डाण केले होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात एका दिवशी सकाळी सुमारे ४ वाजता चीनच्या लढाऊ विमानाने उड्डाण केले होते. संभाव्य हवाई क्षेत्राचे उल्लंघन झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज झाले होते.

२८ जूनच्या पहाटे फॉरवर्ड एरियात तैनात असलेल्या भारतीय रडारमध्ये चिनी लढाऊ विमानाला उड्डाण करताना पकडले होते. त्यानंतर तत्काळ हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली होती. चीनच्या या कुरापतीला प्रत्युत्तर देण्यासाठी एअरबेसवरून लढाऊ विमाने सज्ज झाली होती. पण चिनी लढाऊ विमाने माघारी परतली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही घटना अशावेळी घडली आहे जेव्हा चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी आणि वायुसेना त्यांच्या एलएसीच्या बाजूने पूर्व लडाखकडे सराव करत आहेत. एप्रिल- मे २०२० मध्ये अशा प्रकारच्या सरावांदरम्यानच चिनी सैन्याने पूर्व लडाखमध्ये घुसखोरी केली होती. तेव्हापासून दोन्ही देशांच्या सैन्याने याठिकाणी सीमेवर ५० हजारांहून अधिक सैन्य फॉरवर्ड लोकेशनवर तैनात ठेवले आहे.

प्रतिस्पर्ध्याच्या हवाई संरक्षण उपायांची तपासणी करण्यासाठी आणि पाळत ठेवण्यासाठी त्यांना लागणाऱ्या प्रत्युत्तर वेळेची तपासणी करण्यासाठी भारतीय आणि चिनी हवाई दल दोन्ही LAC जवळ विमाने आणि ड्रोन उडवतात. पण LAC वर अगदी जवळून विमान उडवण्याची घटना दुर्मिळ असल्याचे सूत्राने म्हटले आहे.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT