एलएसी’वरील उंच भाग भारतीय सैन्याच्या ताब्यात | पुढारी

एलएसी’वरील उंच भाग भारतीय सैन्याच्या ताब्यात

बीजिंग/लेह : वृत्तसंस्था

चीनने ‘एलएसी’वर 70 हजारांवर सैनिक तैनात केल्याचे सांगण्यात येते. भारताकडूनही 50 हजार जवान सज्ज आहेत; पण महत्त्वाचे म्हणजे ‘एलएसी’वरील बहुतांश उंच भागांवर भारताने ताबा मिळविला आहे. भारताने जवळपास सर्वच उंच भागातून आपल्या छावण्या उभ्या केल्या आहेत. भारताने वरून मारा केल्यास काय होईल, या विवंचनेतून चिनी छावणीत भीतीचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे, चिनी समाजमाध्यमांतून या गोष्टीचीच चर्चा सध्या आहे. ‘ओपन इंटेलिजन्स सोर्स’ ‘डेस्ट्रेफा’च्या माहितीनुसार, चिनी समाजमाध्यमांतून भारतीय छावण्यांची सद्यस्थिती अधोरेखित करणारी छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहेत. ही छायाचित्रे चिनी उपग्रह ‘गाओफेन -2’ने टिपलेली असल्याचेही सांगण्यात येते. ‘स्पांगुर गॅप’मध्ये उंचावर वसलेल्या भारतीय छावण्या या छायाचित्रांतून दिसत आहेत, तर चिनी सैन्य शिबिरे खालच्या बाजूला दिसत आहेत. पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील डोंगरांवरून भारतीय जवान चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीच्या छावणीवर वरून लक्ष ठेवत असल्याचे दिसत आहे.

चीन ब्लॅकटॉप हिलवर तैनात

चीनने ब्लॅकटॉप हिलच्या परिसरात जोरदार तैनाती सुरू केली आहे. भारतीय छावण्यांच्या तयारीमुळे चीनने येथेही आधार शिबिरे सुरू केली आहेत. एक तुकडी पडल्यास दुसरी सज्ज असेल, अशी व्यवस्था चीनने करून ठेवली आहे, हेसुद्धा ‘डेस्ट्रेफा’ने उपग्रह छायाचित्रांच्या आधारे प्रसिद्ध केले आहे.

चीनच्या एकूण कारवाया बघता भारतीय सैनिकांनी कुठलेही शिखर सोडलेले नाही. परिसरातील सर्वाधिक उंच शिखरांवरही भारतीय जवानांनी आधीच तळ ठोकलेला आहे. पैकी दोन शिखरे सर करण्यासाठी पहाटे चिनी सैनिकांनी चढाई सुरू केली असता छोट्याशा पठारावर आधीच भारतीय जवान हजर असल्याचे पाहून चिन्यांवर माघार घेण्याची वेळ ओढवल्याचे प्रसंगही घडले आहेत. फिंगर-2 आणि फिंगर-3 भागात भारताने आपली हजेरी वाढविलेली आहे. शस्त्रे आणि अवजड लढाऊ उपकरणांनी संपूर्णपणे सज्ज असलेल्या भारतीय सैन्याने ‘ठाकुंग’पासून ‘रेकिन ला’पर्यंत सर्व महत्त्वाच्या शिखरांवर आपला ठिय्या मजबूत केलेला आहे.

Back to top button