प्राचीन आकाशगंगेच्या जीवाश्माचा लागला शोध | पुढारी

प्राचीन आकाशगंगेच्या जीवाश्माचा लागला शोध

वॉशिंग्टन : ‘एंड्रोमेडा गॅलक्सी’च्या अवकाशात एका प्राचीन गॅलक्सीचे जीवाश्म सापडले आहे. याचा शोध चक्‍क एका शौकिन स्कायवॉचरने लावला आहे. यावर आपली कशी नजर पडली नाही म्हणून खगोलशास्त्रज्ञही चकित झाले आहेत. स्कायवॉचर ग्यूसेप डोनाटिलो यांनी अंधुक दिसत असलेली ही आकाशगंगा पाहिली. या आकाशगंगेला आता ‘पेगासस-व्ही’ असे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर खगोलशास्त्रज्ञांनी मोठ्या हवाईन टेलिस्कोपच्या मदतीने या आकाशगंगेतील ‘जेमिनी नॉर्थ’ भागाचा सविस्तर अभ्यास केला. या खगोलशास्त्रज्ञांच्या मते, पेगासस- व्ही हे एक अत्यंत प्राचीन आणि तार्‍यांनी भरलेल्या आकाशगंगंचे जीवाश्म असू शकते.

स्कायवॉचर ग्यूसेप डोनाटिलो व स्पेनचे खगोलशास्त्रज्ञ डेविड मार्टिनेज यांनीही या संशोधनात प्रामुख्याने भाग घेतला. त्यांच्या मते, ही एक अत्यंत प्राचीन आकाशगंगा असून तिचे जीवाश्म तेथे आहे. या भागात अशा अनेक आकाशगंगा असू शकतात. मात्र, अद्याप पाहण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, ब्रिटनमधील सरे युनिव्हर्सिटीचे खगोलशास्त्रज्ञ मिशेल कोलिन्स यांच्या मते, शोध लावण्यात आलेल्या आकाशगंगेच्या जीवाश्माच्या माध्यमातून आकाशगंगा कशा तयार होतात, डार्क मॅट्टर कसा बनतो, याबाबतचा आमचा समज योग्यच आहे.

Back to top button