अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाटगाव रिंगरोडवर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ७ जण ठार झाले. तर सहाजण गंभीर जखमी झाले. भरधाव ट्रक व तवेरा वाहनात झालेल्या भीषण धडकेत ५ जण ठार, तर ६ महिन्याच्या बाळासह ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दुधाचा माल घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाने ट्रकला धडक दिल्याने २ जण ठार झाले.
नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाटगाव रिंगरोडवर रविवारी सकाळी ट्रक व तवेरा वाहनात झालेल्या भीषण धडकेत चालक रोशन रमेश आखरे यांच्यासह वाहनातील प्रतिभा सुभाष पोकळे (५०), कृष्णा अतुल गाडगे (८ वर्ष, शिरजगाव कसबा), गजानन दारोकार (४५, रा. जरुड) व विजय भाऊराव पोकळे यांचा मृत्यू झाला. तर पिहु सचिन गाडगे (६ महिने) हिच्यासह ललीता विजयराव पोकळे (५०), सुभाष भाऊराव पोकळे (६०), सुरेश भाऊराव पोकळे (५८ सर्व रा. अंजनगाव बारी), संगिता गजानन दारोकार (३५, रा. जरुड) व रश्मी सचिन गाडगे हे जखमी झाले. साखरपुडा समारंभासाठी जाताना काळाने पाेकळे कुटुंबीयांवर घाला घातला.
दुधाची खेप पोहोचून देण्याच्या घाईत झोपेची गुंगी आली आणि चालकाचे संतुलन बिघडून भरधाव चारचाकी वाहन ट्रकवर धडकले. ही घटना नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावर्डीजवळ रविवारी पहाटे ३.४५ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. सागर श्यामराव बाहे (२८, रा. रामनगर, नागपूर) व राजू बापुराव किरनाके (५२, रा. फुटाळा कॅम्पस, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. आशिष अरुण धुर्वे (२८ रा. रविनगर, नागपूर) हा जखमी झाला आहे. आशिषने या अपघाताची माहिती पोलिसांना दिली.
ट्रक व तवेरा वाहनाच्या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली होती. या मार्गावरील वाहतूक खोळंबल्यामुळे ये-जा करणारी वाहने थांबून अपघातग्रस्त वाहनांना पाहत होते. दरम्यान या मार्गाने जाणारी एमएच २७ बीझेड १५३० या क्रमांकाच्या अल्टो कार चालकाचे स्टेअरींगवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन आदळली. या अपघातातही दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाले. नागरिकांनी त्यांनीही उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठविले.
हेही वाचलंत का ?