राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा
अलिशान चारचाकी भाड्याने देण्याचे आमिष दाखवून त्या परस्पर विक्री किंवा गहाण ठेवत, भरमसाठ पैसे घेत मूळ गाडी मालकाना गंडा घालण्याच्या प्रकरणातील ४८ गाड्या खेड पोलिसांनी शुक्रवारी (दि. ३) ज्या त्या मालकांच्या स्वाधीन केल्या.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत मिळालेल्या गाड्या परत घेताना गाड्या मालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. याप्रकारे फसवणूक झालेल्या जवळपास ५५० गाड्या असून, खेड पोलीस ठाण्यांतर्गत ५५ गाड्या होत्या. त्यातील ४८ गाड्या मिळून आल्या, तर २ गाड्यांचा तपास पूर्ण झाला असून, उर्वरीत ५ गाड्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी सांगितले. (Pune vehicles fraud)
याबाबत अमोल मनाजी भागडे (रा. पाडळी) व सुभाष बाळू सांडभोर (रा. थिगळस्थळ, राजगुरूनगर, ता. खेड) यांनी दिनांक ४ नोव्हेंबर रोजी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार सांडभोर यांच्याकडून गेले एक ते दीड वर्षापासून आरोपी सागर मोहन साबळे (रा. साबळेवाडी, ता. खेड) याने वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण ५५ चारचाकी गाड्या मासिक भाडेतत्वावर घेतल्या. त्यावर महिन्याला ठराविक रक्कम देतो, असे सांगत सुरुवातीला ठरल्याप्रमाणे भाडे दिले. त्यानंतर साबळे याने, फिर्यादींचा विश्वास संपादन करून, काही कालावधीनंतर भाडे देणे बंद करून, त्या गाड्यांपैकी काही गाड्या परस्पर विक्री केल्या तर काही गहाणवट ठेवत सर्वांची फसवणूक केली. (Pune vehicles fraud)
या प्रकाराबाबत दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. त्यामध्ये संशयित आरोपी सागर साबळे व त्याच्या साथीदारांनी सदरच्या गाड्या माजलगाव, बीड, परभणी, पाथरी, हिंगोली, बडवनी या भागातील लोकांना बेकायदेशीरपणे विकल्याचे निष्पन्न झाले. एकूण ५५ गाड्यांपैकी काही गाड्यांचा जी.पी.एस. द्वारे शोध घेण्यात आला. तसेच काही गाड्यांचा शोध खबरी आणि आरोपींमार्फत शोध घेतला. (Pune vehicles fraud)
या तपासात पोलिसांनी आत्तापर्यंत एकुण ४८ गाड्या हस्तगत करत आरोपी सागर साबळे व साथीदार अजय लिंबाजी घुमाळ (रा. गजानन नगर माजलगाव, ता. माजलगाव, जि. बीड) यांना अटक केलीय. त्यांचे इतर साथीदार अद्याप अद्याप फरार आहेत. अटक आरोपींना राजगुरूनगर न्यायालयाने ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक सतिषकुमार गुरव यांच्या अधीपत्त्याखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार संतोष घोलप, बाळकृष्ण भोईर, पोलीस नाईक शेखर भोईर, सचिन जतकर, संदिप चौधरी, पोलीस अमलदार निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, विशाल कोठावळे, योगेश भंडारे, रमेश करंडे, संजय रेपाळे यांनी तपास केला.
हेही वाचा