धुळे : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात झालेल्या तिहेरी अपघातात तीन जण ठार तर अकरा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे महामार्गावरील रहदारी ठप्प झाली होती.
पारोळा तालुक्यातील शिर्डी येथे राहणारे प्रमोद रमेश सोनवणे हे त्यांचे चुलत भाऊ भूषण सोनवणे यांच्या लग्नासाठी क्रुझर गाडीने ( क्रमांक एम एच 21 व्ही 21 59) नातेवाईकांसह घरून निघाले होते. रात्री उशिरा लग्न समारंभ आटोपून ते घरी परत येण्यासाठी निघाले असता त्यांची गाडी मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात पोहोचली. यावेळी भरधाव वेगाने जाणारा ट्रक ( एम पी ०९ एच एच ५२०३) यावरील चालकाने एम एच 41 ए टी 0 347 क्रमांकाच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातानंतर रिक्षा आणि ट्रक या दोन्ही गाड्या क्रूजर गाडीवर येऊन आदळल्या. हा अपघात होताच मोठा आवाज झाल्याने मुंबई-आग्रा महामार्गावरील जाणाऱ्या वाहनचालकांनी गाड्या थांबवून तातडीने मदतकार्य सुरू केले.
या दरम्यान या अपघाताची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कळल्याने त्यांचे पथक देखील घटनास्थळी पोहोचले. यानंतर अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. या भीषण अपघातामध्ये प्रमोद सोनवणेसह सुरेश नारायण सोनवणे, शैलेश पंडित सोनवणे, विद्या भूषण कानडे, ताराबाई अशोक वसरे, सुपडू बारकू वसरे, कोमल प्रमोद सोनवणे, वसंत पंडित वंजारी, सुधीर अभिमन पाटील, अरूणाबाई प्रमोद पाटील, भूषण कानडे हे जखमी झाले. जखमींना तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये सरलाबाई पंडित सोनवणे तसेच महेंद्र चुडामण पाटील आणि मालेगाव येथे राहणारे रईस शेख या तिघांचाही मृत्यू झाला. यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ट्रक चालकाविरोधात भादवि कलम 304, 337, 338, 279, 427 मोटर वाहन कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.