पुढारी ऑनलाईन : दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या लष्कराच्या 'झुम' या श्वानाचे गुरुवारी (दि. १३) दुपारी निधन झाले. यानंतर भारतीय लष्काराच्या २९ आर्मी डॉग युनिटने आणि त्याच्या साथीदारांनी जम्मूमध्ये भारतीय लष्करी श्वान 'झूम' याला आदरांजली (पाहा व्हिडिओ) वाहिली. यावेळी 'झुम' श्वानाला निरोप देताना, युनिटमधील जवानांसह त्याचे साथीदार भाऊक झाले होते.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन गोळ्या लागल्या होत्या. यामध्ये झूम श्वान गंभीर जखमी झाला होता. 'झूम'वर 54 अॅडव्हान्स फील्ड व्हेटर्नरी हॉस्पिटल (54 AFVH) मध्ये उपचार सुरू होते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११.४५ वाजेपर्यंत झूमची प्रकृती ठीक होती आणि तो उपचाराला चांगला प्रतिसाद देत होता, पण त्यानंतर अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि त्याने १२ वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास (पाहा व्हिडिओ) घेतला.
दहशतवादी ज्या घरात लपले होते ते घर शोधण्याचे काम झूमकडे सोपवण्यात आले होते. या उच्च प्रशिक्षित श्वानाने दहशतवाद्यांची ओळख पटताच त्या घरात घुसून दहशतवाद्यांवर हल्ला केला. ऑपरेशन दरम्यान कुत्र्याला दोन गोळ्या लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला. गोळ्या लागूनही झूमने लढा दिला. त्याने आपले कार्य पूर्ण केले. परिणामी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. झूमने पूर्वीही अनेक सक्रिय मोहिमांचा एक भाग होता.
काही दिवसांपूर्वी, बेल्जियन मालिनॉइस जातीच्या झूमने अनंतनागमधील एका घरात लपलेल्या दोन दहशतवाद्यांना शोधण्यात मोठी भूमिका पार पाडली होती. त्यानंतर भारताच्या जवानांनी त्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी (दि. १०) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी (पाहा व्हिडिओ) झूमच्या मदतीने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.