10 जखमा, एक फॅक्चर, एक गोळी झेलून देशासाठी एक्सलने दिले प्राण! आर्मीच्या श्वानाला आज सलामी | पुढारी

10 जखमा, एक फॅक्चर, एक गोळी झेलून देशासाठी एक्सलने दिले प्राण! आर्मीच्या श्वानाला आज सलामी

पुढारी ऑनलाइन वृत्तसेवा : जम्मू आणि काश्मीरमध्ये शनिवारी (दि.30) आतंकवाद्यांसोबतच्या एका चकमकीत भारतीय लष्कराच्या 29 राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात ‘एक्सल’ या श्वानाला वीरमरण आले आहे. शनिवारी एक्सल याला आतंकवाद्यांशी लढत असताना एक गोळी लागली त्यामुळे त्याचे प्राण गेले.

जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील क्रीरी या भागात वानीगम बाला येथे काही आतंकवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सेनेने एक ऑपरेशन राबविले. एक्सल या ऑपरेशनचा महत्वाचा भाग होता. एक्सलने आतंकवाद्यांचे ठिकाण शोधण्यात मोठी भूमिका बजावली. सेनेसोबतच एक्सल देखिल आतंकवाद्यांवर तुटून पडला होता. एक्सलच्या आक्रमणाने काही आतंकवादी पळून गेले. तर सेनेने केलेल्या या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी आतंकवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एक गोळी एक्सलला लागली. तरीही एक्सल शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा करत होता.

या चकमकीत एक आतंकवादी मारला गेला असून दोन सुरक्षासैनिक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर एक्सलचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये एक्सलच्या शरीरावर 10 ठिकाणी जखमा झाल्याच्या आढळल्या. तसेच एक फॅक्चर देखिल होते. त्यानंतर त्याला एक गोळी लागली. एक्सलच्या शरीरावरील या जखमा त्याच्या बहाद्दुरी आणि देशप्रेमाची साक्ष देतात. एक्सलवर अंत्यसंस्कार करून आज त्याला सेनेकडून सलामी देण्यात येणार आहे. देशासाठी प्राण न्योछावर करणा-या एक्सलला पुढारीकडूनही आदरांजली.

Back to top button