पुढारी ऑनलाईन : झेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग शहर गोळीबाराने हादरले आहे. येथील चार्ल्स विद्यापीठात झालेल्या अंधाधुंद गोळीबारात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक जखमी झाले आहेत. प्रागमधील विद्यापीठ इमारतीत हल्लेखोर शिरला आणि त्याने अंधाधुंद गोळीबार केला. गोळीबार करणारा व्यक्ती हा २४ वर्षीय विद्यापीठाचा विद्यार्थी निघाला आहे. गंभीर बाब म्हणजे त्याने आधी त्याच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली आणि नंतर त्याने प्राग विद्यापीठात अंधाधुद गोळीबार करुन १४ लोकांना ठार केले आणि २५ जणांना जखमी केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Prague University Shooting)
युरोपियन इतिहासातील ही सर्वात वाईट सामूहिक गोळीबाराची घटना आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर झेक प्रजासत्ताकने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर राष्ट्राध्यक्ष पेट्र पावेल म्हणाले की २३ डिसेंबर हा दुखवटा दिवस असेल. या दिवशी सरकारी इमारतींवर ध्वज अर्ध्यावर आणला जाईल आणि लोकांनी दुपारी एक मिनिटाचा मौन पाळण्यास सांगितला जाईल.
चार्ल्स विद्यापीठाच्या कला शाखेच्या इमारतीमध्ये गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सुमारे दुपारी ३ वाजता गोळीबार झाला. बंदुकधारी व्यक्तीने इमारतीचा कॉरिडॉर आणि वर्गखोल्यांमध्ये गोळीबार केला. यात मोठी जीवितहानी झाली. काही कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी खोलीत स्वत: ला वाचवण्यासाठी बॅरिकेड आणि फर्निचरचा वापर केला. (Czech University Shooting)
सोशल मीडियावर शेअर झालेल्या फुटेजमध्ये लोक विद्यापीठ इमारतीच्या छतावरून आणि कठड्यावरुन उड्या मारताना दिसतात. यावेळी गोळीबाराचा आवाजही ऐकू येतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदूकधारी हा विद्यापीठातील २४ वर्षांचा विद्यार्थी होता आणि त्याची कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याच्याकडे शस्त्रसाठा आणि दारूगोळा सापडला आहे. पण त्याने हे कृत्य कशामुळे केले? याचा तपास पोलीस करत आहेत.
या गोळीबाराच्या घटनेपूर्वी पोलिसांना आदल्या दिवशी अशी माहिती मिळाली होती की संशयित व्यक्ती आत्महत्येच्या उद्देशाने जवळच्या गावातून प्रागच्या दिशेने जात आहे. थोड्या वेळाने त्या व्यक्तीचा वडील मृत झाल्याचे समजले होते.
पोलिसांनी खबरदारी म्हणून कला विद्याशाखेची इमारत रिकामी केली होती. जिथे शूटर व्याख्यानाला उपस्थित राहणार होता. पण नंतर त्यांना फॅकल्टीच्या मोठ्या मुख्य इमारतीत बोलावण्यात आले. कारण गोळीबाराच्या वृत्तानंतर तो काही मिनिटांतच तिथे पोहोचले, असे पोलीस अध्यक्ष मार्टिन वोन्ड्रासेक यांनी सांगितले. (czech republic shooting)
वोन्ड्रासेक पुढे म्हणाले की, मागील आठवड्यात प्रागच्या बाहेरील एका गावातील जंगलात एका व्यक्तीचा आणि त्याच्या दोन महिन्यांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे बंदूकधारी विद्यार्थी संशयित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (Prague University Shooting)
विद्यापीठातील गोळीबारानंतर संशयित हल्लखोराचाही मृत्यू झाला. बंदुकधारी व्यक्तीचा मृत्यू ही आत्महत्या असण्याची शक्यता आहे. पण पोलिसांनी त्याला ठार मारले असावे का? याचाही अधिकारी तपास करत आहेत, असे वोन्ड्रासेक पुढे म्हणाले.
झेक प्रजासत्ताकमध्ये गोळीबाराच्या घटना दुर्मीळ आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये झेकमधील ऑस्ट्रावा येथे एका ४२ वर्षीय बंदुकधारीने हॉस्पिटलच्या प्रतीक्षालयात सहा जणांची हत्या केली होती. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले होते. २०१५ मध्ये एका व्यक्तीने उहेरस्की ब्रॉड येथील रेस्टॉरंटमध्ये ८ जणांना गोळ्या घालून ठार मारले होते.
हे ही वाचा :