Washington : हत्येच्या संशयामुळे ४८ वर्षे काढावी लागली जेलमध्ये, आता निर्दोष; १.४६ कोटी मिळणार भरपाई | पुढारी

Washington : हत्येच्या संशयामुळे ४८ वर्षे काढावी लागली जेलमध्ये, आता निर्दोष; १.४६ कोटी मिळणार भरपाई

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : वर्ष 1974, ठिकाण ओक्लाहोमा, दोन चोर दारूच्या दुकानात घुसतात! गोळीबार करतात आणि चोरी करून ते पळून जातात! गोळीबारात कॅरोलिन सू रोजर्स नावाची व्यक्ती मारली जाते. हत्येप्रकरणी संशयित, ग्लिन सिमन्स, डॉन रॉबर्टस, लियोनार्द पॅटरसन आणि डेलबर्ट पॅटरसन यांना पोलिस पकडते! गोळीबारात जखमी प्रत्यक्षदर्शी एका महिलेची साक्ष घेतल्यानंतर पोलिसांकडून ग्लिन सिमन्स आणि डॉन रॉबर्टस यांना अटक केली जाते. त्यांच्यावर खटला चालविला जातो आणि दोघांना फाशीची शिक्षा सुनावली जाते.

यानंतर अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाकडून 1975 मध्ये ग्लिन आणि रॉबर्टस यांची फाशीची शिक्षा आजीवन कारावासामध्ये बदलली जाते. 2008 मध्ये रॉबर्टसला पॅरोलवर सोडले जाते; पण ग्लिन जेलमध्येच राहतो. आता या प्रकरणाचा सुमारे 48 वर्षांनंतर ओक्लाहोमा कोर्टाने ग्लिनची निर्दोष मुक्तता केली आहे. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार, या खटल्याप्रकरणी जे पुरावे सादर करण्यात आले ते ग्लिनला शिक्षा देण्यास पर्याप्त नव्हते. कोणत्याही पुराव्याशिवाय ग्लिनला शिक्षा ठोठावण्यात आली होती. ज्या महिलेने जखमी अवस्थेत साक्ष दिली होती, तिच्या डोक्याला मार लागला होता. पोलिसांना ती बेशुद्ध अवस्थेत मिळाली होती. त्यामुळे ज्या गुन्ह्यासाठी ग्लिनला दोषी ठरवून तुरुंगात टाकले होते, तो गुन्हा ग्लिनने केलाच नसल्याचा युक्तिवाद ओक्लाहामा कोर्टाने केला आहे. सरकारी वकिलांनी ग्लिनच्या वकिलांना पुरावेच दिले नव्हते, ज्यामुळे ग्लिन निर्दोषत्व सिद्ध होऊ शकले.

1.46 कोटींची भरपाई मिळणे शक्य

कायद्यानुसार चुकीच्या आरोपाखाली शिक्षा भोगणार्‍या व्यक्तीला नुकसानभरपाई दिली जाते. ओक्लाहोमामध्ये यासाठी 1.46 कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. त्यामुळे ग्लिनने गरजेपेक्षा अधिक तुरुंगवासाची शिक्षा भोगल्याने त्याला पूर्ण नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्लिनच्या वकिलांनी सांगितले.

Back to top button