Pakistan : पाक लष्कराकडून छळ; ७ बलुच विद्यार्थ्यांचा मृत्यू | पुढारी

Pakistan : पाक लष्कराकडून छळ; ७ बलुच विद्यार्थ्यांचा मृत्यू

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : पाकिस्तानी लष्कर व आयएसआयने अलीकडेच बलुचिस्तान प्रांतातील तुर्बत आणि केच भागातील 7 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. लष्कराने केलेल्या छळात या सातही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने बलुच जनमानस शोकसंतप्त आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर संतप्त बलुच नागरिकांनी इस्लामाबादकडे कूच केले आहे.

बलुच मोर्चा सुरू झाल्यानंतर एकामागून एक कबिले त्याला येऊन मिळत गेल्याने मोर्चेकर्‍यांची संख्या एक लाखावर गेल्याचे सांगण्यात येते. मोर्चातील सहभाग पाहून इस्लामाबादचे धाबे दणाणले आहे.

बलुचिस्तानमधील नागरिक पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराला बळी पडल्याची ही काही पहिली घटना नाही. वर्षानुवर्षे अशा घटना सातत्याने घडत आहेत. दरवेळी निदर्शने होतात. लष्कर ती दडपून टाकते. यावेळी मात्र मोर्चातील विशेषत: महिलांचा लक्षणीय सहभाग पाहून पाकिस्तानी लष्कराचीही बोबडी वळली आहे. लष्कराने हे प्रकरण दडपण्यासाठी आंदोलकांचे नेतृत्व करणार्‍या बलाच बलुच या मृत विद्यार्थ्याच्या नजमा बलुच या बहिणीला 7 कोटी रुपयांचे आमिष दाखविले, पण या बहिणीने ते फेटाळून लावले.

मोर्चा पुढेच जात असताना पाक लष्कराने डेरा गाझी खान भागात तो रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात लष्कराला यश आले नाही. इस्लामाबादमध्ये आता लष्कराच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. अनेक राज्यांतील पोलिसांना इस्लामाबादला बोलावले
जात असून शहराच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.

Back to top button