पुढारी ऑनलाईन डेस्क :
चहा हा शब्दच आपल्या दिवसाची सुरुवात करताे. इतकं सर्वसामान्यांचे या पेयाशी नातं घट्ट झालं आहे. काळानुसार चहामध्येही बदल हाेत गेले. आता आपल्या रेग्युलर चहाबराेबरच ब्लॅक आणि ग्रीन टी हेही सर्वमान्य झाले आहेत; पण आता चक्क साेन्याचा चहा बाजारात आला आहे.
आसामचे चहा उत्पादक रणजित बरुआ यांनी तब्बल अडीच लाख रुपयांचा साेन्याचा चहा (Gold Tea ) बनवला असून, तो २४ कॅरेट सोन्याचा आहे. या आधी बरुआ हे मध, गूळ आणि कोकोपासून युरोपात महागडा चहा विकून चर्चेत आले होते. जवळपास दोन दशकाहून अधिक काळ चहाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बरुआ यांनी युक्रेनचे राष्ट्रपती ब्लादिमीर झेलेन्स्की यांच्या नावावर सुद्धा चहा बनवला आहे.
शनिवारी (२१ मे) आंतराष्ट्रीय चहा दिवस झाला. या दिवशी चहाचे प्रकार, चहाचे फायदे, त्याचा इतिहास आणि बरंच काही तुमच्या वाचनात आले असेल. सध्या असाच एक अनोखा चहा चर्चेत असून याची किंमत तब्बल अडीच लाख रुपये प्रति किलो असून याच्या एका घोटाने एक वेगळाच अनुभव येतो असे बरुआ यांनी म्हटलं आहे.
गोल्डन ड्रिंक म्हणून ओळखला जाणारा या चहामध्ये खाण्यायोग्य २४ कॅरेट सोन्याच्या पाकळ्या असून त्यासोबत मध, आसामचा ब्लॅक टी आणि चहाची विशेष पाने यामध्ये आहेत. यामध्ये वापरलेल्या सोन्याच्या पाकळ्या खास फ्रान्स रून मागवण्यात आल्या आहेत, असेही बरुआ यांनी सांगितले.
२१ मे रोजी आंतराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्ताने बरुआ यांच्या 'एरोमिका टी' या कंपनीने हा चहा लॉन्च केला असून हा एकमेव गोल्डन चहा आहे. या चहाच्या लॉंचच्या आधीच चहासाठी १२ ऑर्डर्स आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. कंपनीने आतापर्यंत ४७ हून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे चहा बनवले आहेत.
हेही वाचा….