Latest

पुणे: मांगूरची वाहतूक करणारा टेम्पो पकडला, १ हजार ८०० किलो मासे केले नष्ट

अमृता चौगुले

इंदापूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातलेल्या व पर्यावरणास घातक असलेल्या थाई मांगुरची अवैध वाहतूक करणारा टेम्पो इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतला असून १ हजार ८०० किलो मासे शास्त्रीय पद्धतीने जप्त करून नष्ट केले. याप्रकरणी चालक आणि मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १४) करण्यात आली. या कारवाईमुळे मांगुर माशांची पैदास व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर राजवडी (ता. इंदापूर) उड्डाणपूलाखाली बंदी असलेल्या मांगूर माश्यांची मास्यांची वाहतूक करणारा लाल रंगाचा आयशर टेम्पो (एमएच ४२ बीएफ ५९९५) इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतला. जवळपास १ हजार ८०० किलो मांगुर मासे जप्त केले. इंदापूर शहरातील नगरपरिषदेच्या कचरा डेपो येथे जेसीबीच्या साह्याने तब्बल १० फुटांचा खड्डा खोदून त्यामध्ये हे सर्व मांगुर मासे मीठ टाकून नष्ट करण्यात आले. याबाबत पुण्याचे सहायक मत्स्य विकास अधिकारी किरण माधवराव वाघमारे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही कारवाई मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाचे मत्स्य व्यवसाय अधिकारी बी. एस. पाटील, आर. आर. राठोड, शुभम कोमरेवार, इंदापूरचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व नगरपरिषदेच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आली. दरम्यान मांगुर संवर्धन व विक्री व्यवसायात असणाऱ्या लोकांबाबत तपासणी सुरू असल्याचेही फिर्यादी मत्स्य विकास अधिकारी वाघमारे यांनी सांगितले.

पर्यावरणाच्या हानीसोबतच मानवी आरोग्यास अपायकारक

आरोग्यास धोकादायक असलेला व राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातलेल्या मांगुर मास्यांचे उजनी पाणलोट क्षेत्रात अतिशय मोठ्या प्रमाणात व खुलेआमपणे संवर्धन केले जात आहे. त्याचे उत्पादन घेताना त्याला कत्तलखान्यातील कुजलेल्या (शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी) इत्यादींच्या मासाचे अवशेष खाद्य म्हणून वापरले जाते. यामुळे पर्यावरणाची हानी होते. त्याशिवाय हा मासा मानवी प्रकृतीला देखील घातक आहे. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने २२ जानेवारी २०१९च्या निर्णयाद्वारे या माशाच्या उत्पादनावर व विक्रीवर बंदी घातली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT