भवानीनगर : शेतकर्‍यांनी पाडले निरा डावा कालव्याचे काम बंद | पुढारी

भवानीनगर : शेतकर्‍यांनी पाडले निरा डावा कालव्याचे काम बंद

भवानीनगर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : काटेवाडी (ता. बारामती) येथे ग्रामस्थांनी निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरण तसेच काँक्रिटीकरणाच्या कामाला विरोध करून कालव्याचे काम बंद पाडले. या वेळी माजी सभापती संजय काटे, कन्हेरीचे माजी सरपंच सतीश काटे, बाळासाहेब शिंदे, संभाजीराव काटे, नितीन काटे, दत्तात्रय काटे, सुभाष झगडे, रोहित काटे, अमर सुपेकर आदींसह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. काटेवाडी गावच्या हद्दीमध्ये शेर पुलाजवळ निरा डावा कालव्याच्या काँक्रिटीकरण कामाला सुरुवात करण्यात आली होती. याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी ते काम बंद पाडून कालव्याच्या काँक्रिटीकरणाला विरोध केला.

या वेळी संजय काटे म्हणाले, ज्या ठिकाणी विरोध होईल त्या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी या ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या कामाला विरोध केला आहे. शेर पुलापासून ते पिंपळीपर्यंतच्या भागातील शेतकर्‍यांची शेती पूर्णपणे निरा डावा कालव्याच्या पाझराच्या तसेच फाट्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. निरा डावा कालव्याला काँक्रिटीकरण केल्यास कालव्यातून होणारा विहिरींचा पाझर पूर्णपणे बंद होणार आहे. कालव्याच्या पाझराचे पाणी सोनगाव चारीतून जाते. या चारीलगत अनेक शेतकर्‍यांच्या विहिरी आहेत, या विहिरींनादेखील चारीच्या पाण्याचा पाझर आहे.

कालव्याचे काँक्रिटीकरण केल्यास चारीत पाझरून येणारे पाणीदेखील बंद होणार आहे. चारीला पाणी येत असल्यामुळे चारीच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात जनावरांच्या चार्‍यासाठी गवत उपलब्ध होत असते. परिसरातील ग्रामस्थांच्या शेळ्या-मेंढ्या या चार्‍यावर अवलंबून आहेत. चारीचे पाणी बंद झाल्यानंतर गोरगरिबांच्या शेळ्या-मेंढ्यांच्या चार्‍याचादेखील प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शेर पुलापासून पिंपळीपर्यंत निरा डावा कालव्याचे काँक्रिटीकरण करण्यात येऊ नये, अशी मागणी काटे यांनी केली.

Back to top button