वरंधा घाटातील दरडी अद्यापही ‘जैसे थे’

वरंधा घाटातील दरडी अद्यापही ‘जैसे थे’

भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातील भोर व महाड हद्दीतील अनेक ठिकाणी पडलेल्या दरडी अद्यापही हटविण्यात आलेल्या नाहीत. दोन ठिकाणी मोरी व संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण आहे. गटारे साफ केलेली नाहीत, तर दगड-माती पडलेली आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या अपुर्‍या कामामुळे वरंध घाटात अपघातांचे प्रमाण वाढू लागले. पावसाळ्यात घाट बंद होण्याची भीतीही आहे. त्यामुळे घाटात रस्त्यावरील संरक्षक भिंत, कठडे, मोरी तसेच दरडीची कामे पूर्ण करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होत आहे.

भोर तालुक्यातून कोकणात जाणारा जवळचा मार्ग म्हणजे भोर-महाड रस्ता आहे. या मार्गावर पावसाळ्यात 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हिर्डोशी, वारवंड, कारुंगण, शिरगाव, उंबार्डेवाडी व उंबार्डे गावच्या हद्दीत अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. पूल वाहून गेले होते. संरक्षक भिंत पडल्यामुळे रस्ता वाहतुकीस बंद होता, तर महाड तालुक्याच्या हद्दीत 5 ते 6 ठिकाणी रस्ता वाहून गेला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन-तीन ठिकाणी नवीन मोरी, संरक्षक भिंत बांधून रस्त्यावरील कारपेटचे कामही केले आहे. मात्र, हिर्डोशी गावाजवळ पडलेल्या दरडी दोन वर्षांपासून तशाच आहेत. याबाबत काहीही उपाययोजना केली नाही. दरम्यान, उंबार्डेवाडी येथे रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने अरुंद झालेला आहे. मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी रस्ता धोकादायक झाला असून, पावसाळ्यात रस्ता खचून वाहतूक बंद होण्याची भीती आहे. या रस्त्यावर एक ठिकाणी मोरी वाहून गेली, ते काम झालेले नाही. त्यामुळे रस्ता तात्पुरता वळविला आहे. मात्र, पावसाळ्यात दरडी पडून वाहतूक ठप्प होऊ शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

शिरगाव भोर हद्दीपर्यंतचा रस्तादेखील जीवघेणा
शिरगाव भोर हद्दीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याला संरक्षक भिंती तसेच लोखंडी रेलिंग नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री अपघात होतात. परिणामी, नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागतो. त्यामुळे ही कामे लवकर सुरू
करण्याची मागणी पर्यटक व नागरिकांमधून होत आहे.
रामबाग चौकदेखील धोकादायक
भोर-महाड रस्त्यावरील भोर शहरातील रामबाग चौकातील
राम ओढ्यावर संरक्षक कठडे
नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी रामबाग चौकदेखील धोकादायक
झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news