पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात शनिवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. आणि पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर २४ परगणामधील बगदा येथील २० हून अधिक लोक मृतदेह घेऊन नवद्वीप स्मशानभूमीकडे जात असताना ही घटना घडली आहे.
येथील स्थानिक लोकांनी सांगितले की, हंसखळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलबारी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मृतदेह घेऊन जाणारे वाहन धडकले. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आणि काहीजण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.