पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडोनेशियातून (Indonesia) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे फुटबॉलचा सामना सुरू असताना हिंसाचार घडला आहे. या हिंसाचारामध्ये १२७ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना इंडोनेशियातील पूर्व जावा भागात घडली आहे. सामन्याचा निकाल लागल्यानंतर प्रेक्षकांनी धूडगूस घातला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इंडोनेशियातील बीआरआय लीग-१ मध्ये पर्सेबाया सुराबाया आणि अरेमा एफसी यांच्या दरम्यान सामना सुरू होता. हा सामना पर्सेबाया सुराबाया या संघाने ३-२ ने जिंकला होता. हा सामना संपल्यानंतर अरेमा एफसीचे समर्थक संतप्त झाले. त्यांनी मैदानात घुसून हाणामारी सुरू केली. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि इंडोनेशियन राष्ट्रीय सशस्त्र दल मैदानात दाखल झाले. त्यांनी पर्सेबाया सुराबायाच्या खेळाडूंचं संरक्षण केलं.
स्थानिक मीडियातील रिपोर्टनुसार मैदानात सुरक्षा दल आणि फॅन्समध्ये हाणामारी झाली. यावेळी नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी आश्रू धुराच्या कांड्यांचा मारा केला. (Indonesia)
यामुळे मैदानातील चाहत्यांमध्ये एकच धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरी घटना घडली. या चेंगराचेंगरीत १२७ जणांच्या मृत्यू झाला. तर, अनेक जण गंभीररित्या जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर इंडोनेशिया बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.
पीटी लीगा इंडोनेशिया बारूचे अध्यक्ष अखमद हदियन लुकिता यांनी या घडनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आम्ही या घडनेमुळे चिंतीत आणि दु:खी आहोत. या घटनेमधून आम्हा सर्वांसाठी एक धडा मिळेल, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, असे ते म्हणाले.